धारूरच्या उसतोड कामगाराचा कर्नाटकातील बेळगावात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 13:47 IST2021-10-23T13:46:54+5:302021-10-23T13:47:29+5:30
पाय घसरून विहिरीत पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू

धारूरच्या उसतोड कामगाराचा कर्नाटकातील बेळगावात मृत्यू
धारूर ( बीड ) : ऊस तोडणी करत असताना पाणी आणण्यास गेलेल्या गांजपूर येथील एका उसतोड कामगाराचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी बेळगाव ( कर्नाटक) येथे घडली. तानाजी संभाजी थोरात ( ३५ ) असे मृत उसतोड कामगाराचे नाव आहे. तो कर्नाटक येथील बेळगी सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणीचे काम करण्यास गेला होता.
तालुक्यातील गांजपूर येथील तरुण तानाजी संभाजी थोरात हा कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगी सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणीसाठी पंधरा दिवसा पूर्वी गेलेला होता. शुक्रवारी दुपारी तो ऊस तोडणी करत असलेल्या शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेला. यावेळी अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी आई असा परिवार आहे. गरीब कुटुंबातील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी गांजपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.