पहिल्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ चरणी धनंजय मुंडे लीन; फराळ वाटपातही घेतला सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:45 IST2025-07-28T19:45:08+5:302025-07-28T19:45:53+5:30
श्रावणातील पहिल्या सोमवारी आमदार धनंजय मुंडे यांचे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

पहिल्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ चरणी धनंजय मुंडे लीन; फराळ वाटपातही घेतला सहभाग
परळी ( बीड) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी झाली. याचवेळी राज्याचे माजी कृषी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधीवत पूजा अर्चा केली.
15 जुलै रोजी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस असतानाही त्यांनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम न घेता तो साजरा केला नव्हता. पुष्पहार, सत्कार वा स्वागत स्वीकारले नव्हते. मात्र, आज श्रावणातील पहिल्या सोमवारी सार्वजनिक कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. मंदिर परिसरात नाथ प्रतिष्ठानतर्फे आयोजित खिचडी लाडू वितरणासाठी त्यांनी स्वतः सहभाग घेतला. यावेळी परळीचे तहसीलदार, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व्यंकटेश मुंडे, मंदिर सचिव बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख, नंदकिशोर जाजू व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रसाद वितरणात सहभाग
नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मंदिरात २५ क्विंटल झेंडू, गुलाब, निशिगंधा व अष्टर फुलांनी भव्य सजावट करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झगमगत होता. भाविकांसाठी ४ क्विंटल साबुदाणा खिचडी, १० हजार लाडू आणि दोन पोते पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आल्याची माहिती नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांनी दिली.दुपारी आमदार धनंजय मुंडे, अजय मुंडे आणि प्रा. मधुकर आघाव यांनी प्रसाद वितरण स्टॉलला भेट देत भाविकांमध्ये खिचडी वाटप केले.