'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:40 IST2025-09-07T16:39:06+5:302025-09-07T16:40:34+5:30

'हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे.'

Dhananjay Munde: 'If the police in Beed cannot use surname', Dhananjay Munde expressed regret | 'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

बीड: बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीची राज्यभर चर्चा सुरू झाली. याच प्रकरणामुळे जिल्ह्यात जातीवादाचा मुद्दाही चांगलाच पेटला. यामुळेच बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या नेमप्लेटवरुन आडनाव काढण्यास सांगितले. आता याच मुद्द्यावरुन परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

“हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. ही प्रवृत्ती समाजातील बंधुभावाला धक्का देणारी आहे. जातीजातीत महापुरुष वाटून घेतले जाणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपण सर्वांनी मिळून नाहीशी करून समाजात पुन्हा एकदा खरी समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवार (दि.६) महाराष्ट्र आधार सेना, दैनिक महाराष्ट्र आरंभ आणि सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मुंडे पुढे म्हणतात, “बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आला असेल. आज आपण प्रत्येकाने आपआपलेच महामानव वाटून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरा करायचा का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का?”असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

“महामानवांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करताना आपण महापुरुषांना जातीय बंधनात अडकवत न ठेवता सर्वव्यापी कार्य करायला हवे. माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही. मला सांगायला लाज वाटते की, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल, तर ही सामाजिक समता आहे का? बीडमध्ये ही प्रथा पडली, याची खंत वाटते,” अशी भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.

Web Title: Dhananjay Munde: 'If the police in Beed cannot use surname', Dhananjay Munde expressed regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.