वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:20 IST2025-01-15T19:20:21+5:302025-01-15T19:20:57+5:30
वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Walmik Karad Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडवर काल महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) दाखल करण्यात आला. त्यानंतर आज एसआयटीने बीड कोर्टात हजर केल्यानंतर कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीवर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
मीडियाशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती चालू राहणार आहे. आम्ही तपासासंदर्भात अपडेट घेतली, तपास योग्य दिशेने सुरू आहे. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या फोन कॉलचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले. त्याबाबत धनंजय देशमुख म्हणाले की, दुपारी सव्वा तीनच्या नंतर ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फोन कॉल झाला. दोन-तीन तासांचा तो कालावधी आहे. तपास बाकी आहे, काय काय कनेक्शन सापडतात ते समोर येईल.
कोर्टात त्यांच्या बाजूने काय युक्तिवाद सुरुये, त्यावर आपण त्यावर बोलणार नाही. तो युक्तिवाद आहे, आम्ही न्याय मागतोय. न्याय यंत्रणेला मागितला आहे. आपली न्यायाची भूमिका आहे. आम्ही न्याय मागतोय वकिलाच्या युक्तिवादात जाण्याची गरज नाही. त्यांचे ते काम करतात. आरोपी कोण आहे, सहआरोपी कोण आहे, ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा द्या. यावर आपण ठाम आहोत. न्यायालयीन गोष्टींचा भाग असल्यामुळे त्यावर जास्त बोलणे उचित नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, धनंजय देशमुखांनी आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. याबाबत ते म्हणाले की, सीआयडी अधिकाऱ्यांना आज सहज भेटलो, तपासाबाबत माहिती घेतली आणि निघून आलो. एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची कालच भेट घेतली होती, त्यामुळे आज परत भेट घेण्याची गरज वाटली नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीबाबत देशमुख म्हणाले, काही चर्चा झाली नाही, सहज दादांना भेटून आलो. ज्यावेळेस आम्हाला वाटेल दादांची भेट घ्यायची त्यावेळेस आम्ही घेतो, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.