पायी ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकास ट्रॅव्हल्सने चिरडले, रिक्षालाही उडवल्याने ९ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 20:38 IST2022-07-20T20:38:17+5:302022-07-20T20:38:50+5:30
तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील तरुण दरवर्षी संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त त्यांची जन्मभूमी आरण महाड ते गायकवाड जळगाव अशी पायी ज्योत आणतात.

पायी ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकास ट्रॅव्हल्सने चिरडले, रिक्षालाही उडवल्याने ९ जण जखमी
गेवराई (जि. बीड) : संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आरण येथून पायी ज्योत घेऊन गायकवाड जळगावकडे येणाऱ्या तरुणाासह सोबतच्या रिक्षाला भरधाव ट्रॅव्हल्स बसने उडविले. या अपघातात ज्योत घेऊन चालणारा भाविक हनुमंत आण्णासाहेब आगरकर (वय ४२, रा. गायकवाड जळगाव) हा जागीच ठार झाला तर सोबतच्या रिक्षातील ९ जण जखमी झाले. बुधवारी पहाटे हिरापूरजवळ इटकूर फाट्यावर हा अपघात झाला. यातील जखमींना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील तरुण दरवर्षी संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त त्यांची जन्मभूमी आरण महाड ते गायकवाड जळगाव अशी पायी ज्योत आणतात. यावर्षी ज्योत यात्रेत १० तरुण सहभागी झाले होते. यातील एक भाविक पायी ज्योत घेऊन चालत होता तर उर्वरित युवक रिक्षात बसून प्रवास करीत होते. दरम्यान, ज्योत हिरापूरजवळ इटकूर फाट्याजवळ आली असता बीडकडून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने (क्र. एम.एच २० इ.जी ००५५) रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली.
यात ज्योत घेऊन चालणारा भाविक हनुमंत आण्णासाहेब आगरकर (वय ४२, रा. गायकवाड जळगाव) हा जागीच ठार झाला. या अपघातात विश्वंभर अंतरकर, शैलेश पानखडे, महादेव जावळे, ऋषिकेश आगरकर, परमेश्वर पाखरे, बाळू आगरकर, गजानन वाघमारे, रविराज आगरकर, नंदू आगरकर हे जखमी झाले. त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.