अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 09:42 IST2025-08-08T09:32:17+5:302025-08-08T09:42:26+5:30
मुलाला अत्याचाराच्या प्रकरणातून सोडण्यासाठी फोन केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले.

अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कधीकधी त्यांच्या समर्थकांमुळे ते अडचणीत सापडतात. मात्र चुकीची कामे करणाऱ्यांना अजित पवार हे आक्रमकपणे विरोध देखील करतात. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये पाहायला मिळाला. पालकमंत्री म्हणून बीडच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांच्यासमोर एका आमदाराला आलेल्या फोनमुळे ते चांगलेच संतापले. एका सभेत बोलताना सांगणाऱ्याला लाज, लज्जा, शरम वाटत नाही असं अजित पवार म्हणाले.
पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर असताना आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ मुंडे व बाबरी शेठ मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पक्षाची जनसेवेची विचारधारा सर्वांना समजावून सांगितली. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असून त्यांच्याच आदर्श विचारांवरती पक्षाची वाटचाल सुरू आहे. जनहिताची कामं करताना सर्वांनी समन्वयानं, जनतेत मिसळून कामं करा, जनसंपर्क वाढवा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
त्यादरम्यान, अजित पवार यांनी एक किस्सा सांगितला. "तुम्ही चुका केल्या आहेत पण मी नाव नाही सांगणार. माझ्या गाडीमध्ये आज काही आमदार बसले होते. एकजण सांगत होता की दादा एकजण माझ्याकडे काम घेऊन आलाय. त्यांनी सांगितले की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलं आहे, त्याला सोडवा ना. ते म्हटले कशा करता टाकलं आहे. समोरच्या वक्तीने सांगितले की त्याने बलात्कार केलाय म्हणून जेलमध्ये टाकलं. सांगणाऱ्याला लाज, लज्जा, शरम पण वाटत नाही की माझ्या कारट्याने दिवा लावला आहे. ही विकृती आहे आणि त्याला जेलमधून सोडवण्यास सांगितलं जातंय. कशी तुमची जीभ रेटली जाते. तुम्ही काय विचार करताय. ही विकृती आहे. त्यामुळे पुढची पिढी बिघडेल," असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातही अजित पवारांनी संताप व्यक्त केला होता. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी बोलताना अजित पवारांनी भाष्य केले होते. "माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत. बहुतेक त्यांचे लव्ह मॅरेज आहे. माझा तिथे काही संबंध नाही. मी फक्त लग्नाला गेलो. जे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक नेमली आहेत. माणुसकी म्हणून जबाबदारी म्हणून जे काही करायचे आहे ते आम्ही केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत," असं अजित पवार म्हणाले.