मृत्यूचा सापळा ! वर्षभरात 'या' मार्गावर ४०० अपघातात गेले १९ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 18:47 IST2021-10-09T18:29:08+5:302021-10-09T18:47:33+5:30
आष्टी तालुक्यातील कडा येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते.

मृत्यूचा सापळा ! वर्षभरात 'या' मार्गावर ४०० अपघातात गेले १९ बळी
कडा ( बीड ) : बीड-जामखेड-नगर हा राज्य महामार्ग मागील वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. मात्र, या मार्गावरील २० किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे या मार्गावर वर्षभरात ४०० अपघात होऊन १९ बळी गेले आहेत.
आष्टी तालुक्यातील कडा येथुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. याची दखल घेत विभागाने ५१ किलोमीटर अंतरावर २५ कोटी रूपये खर्च करून हा रस्ता बनवला. मात्र एक वर्षांपासून साबलखेड, कडा, चिंचपूर हा वीस किलोमीटरचा रस्ता अद्याप बनवला नाही, तसेच याची दुरुस्ती देखील करण्यात आली नाही. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे वर्षभरात ४०० अपघातात १९ जणांचे बळी या खड्ड्यांनी घेतला आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, संदिप खाकाळ, दिपक सोनवणे यांनी केली आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर विभागाचे अभियंता दिलीप तारडे यांनी सांगितले की, मागील वर्षांपासून हा रस्ता आमच्याकडे वर्ग झाला आहे. खड्डे बुजवण्यास निधी उपलब्ध नाही. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून लवकरच काम सुरू होईल.