दासू वैद्य यांची १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 06:41 PM2022-02-17T18:41:01+5:302022-02-17T18:41:30+5:30

हे संमेलन येत्या ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे.

Dasu Vaidya elected as President of 10th Ambajogai Sahitya Sammelan | दासू वैद्य यांची १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

दासू वैद्य यांची १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

googlenewsNext

अंबाजोगाई ( बीड ) : मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्यावतीने आयोजित '१० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध, कवी, लेखक प्रा. दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. वैद्य हे अंबाजोगाईचे सुपुत्र असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. हे संमेलन येत्या ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मसाप शाखा अंबाजोगाईचे अध्यक्ष दगडू लोमटे व सचिव गोरख शेंद्रे यांनी दिली आहे.

यापूर्वी प्रा. रंगनाथ तिवारी, शैला लोहिया, प्रा. रा. द. अरगडे, बलभीम तरकसे, प्राचार्य संतोष मुळावकर, मंदा देशमुख, डॉ. श्रीहरी नागरगोजे, गणपत व्यास व डॉ. कमलाकर कांबळे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. हे १० वे संमेलन आहे. या संमेलनात अनिवासी अंबाजोगाईकर लेखक, कवी, कथाकार यांना आमंत्रित केले जाणार आहे.  

प्रा. दासू वैद्य यांचे शिक्षण अंबाजोगाई व औरंगाबाद येथे झाले आहे. शिक्षण घेत असताना त्यांनी कविता व ललित लेखन सुरू केले व विविध वृत्तपत्रात ते प्रसिद्ध झाले. मराठीत एम. ए., एम. फिल, नेट उत्तीर्ण झाले. त्यांनी नाट्य शास्र विषयात पदवी मिळविली आहे. त्यांनी जालना येथे बारवाले महाविद्यालयात मराठीचे दीर्घ काळ प्राध्यापक म्हणून  अध्यापन केले त्यानंतर औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे मराठी विभाग येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आता ते मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. तसेच नव्याने सुरू झालेल्या आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचे ते संचालक आहेत. 

शासनाच्या अनेक भाषाविषयक समित्यांवर त्यांनी काम केले आहे. साहित्य अकादमी, आकाशवाणी, साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र फाउंडेशन- अमेरिका, जनस्थान पुरस्कार निवड समिती, अशा अनेक मंडळावर त्यांना सन्मानाने काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांसाठी, जाहिरातीसाठी गाणी लिहिली, चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक येथील अनेक साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविली आहेत. तसेच त्यांच्या साहित्य कृतींना अनेक मानाचे, सन्मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. 

तूर्तास, तत्पूर्वी हे कविता संग्रह, आजूबाजूला, मेळा हे ललीतबंध, क-कवितेचा हा बाल कवितासंग्रह व भुर्रर्र हा बालकथा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तर बिनधास्त, सावरखेडा, भेट, आजचा दिवस माझा,  सोनियाचा उंबरा, गाभ्रीचा पाऊस, तुकाराम, खाली डोकं वरती पाय या चित्रपटासाठी गीत लेखन केले आहे. तसेच टिकल ते पॉलिटिकल, एक होता राजा, आपली माणस, रंग माझा वेगळा, पदरी आलं आभाळ, घर श्रीमंताच,  या मालिकांसाठी पटकथा व शीर्षकगीत लिहिली आहेत. लेक वाचवा अभियानासाठी त्यांनी गीत लिहिले. 

देशभर व महाराष्ट्रातील अनेक संमेलनात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या या संपूर्ण साहित्य कृतींची व साहित्य सेवेची  दखल घेऊन मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाई यांनी त्यांना १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यपदी यापूर्वीच प्राचार्य बी. आय. खडकभावी यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Dasu Vaidya elected as President of 10th Ambajogai Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.