महिलांच्या कष्टाच्या पैशावर 'डाका'! बचत गटांचे १६ लाख रुपये क्षेत्रीय अधिकाऱ्यानेच हडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:30 IST2025-10-31T15:29:54+5:302025-10-31T15:30:24+5:30
क्षेत्रीय अधिकाऱ्याने वसूल केलेले १६ लाखांचे कर्ज कंपनीकडेच जमा केले नाही; फसवणुकीचा गुन्हा दाखल

महिलांच्या कष्टाच्या पैशावर 'डाका'! बचत गटांचे १६ लाख रुपये क्षेत्रीय अधिकाऱ्यानेच हडपले
- मधुकर सिरसट
केज (बीड): महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अल्प व्याजदराने कर्ज देणाऱ्या एका फायनान्स कंपनीतील क्षेत्रीय अधिकाऱ्यानेच महिला बचत गटांकडून वसूल केलेल्या कर्जाच्या रकमेत मोठा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अधिकाऱ्याने ७९ महिलांकडून १६ लाखांहून अधिक रक्कम वसूल करून ती कंपनीच्या खात्यावर जमा केलीच नाही.
नेमके काय घडले?
केज येथील भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन लि. या कंपनीच्या शाखेत अरबाज रशीदखाँ पठाण (वय २७, रा. अजीजपुरा, केज) हा क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने २३ ऑगस्ट २०२३ ते ३ मे २०२४ या कालावधीत केज तालुक्यातील महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची परतफेड म्हणून ७९ महिलांकडून हप्त्यापोटी एकूण ₹ १६ लाख ९ हजार ८६३ एवढी रक्कम रोख स्वरूपात जमा केली. मात्र, जमा केलेली ही रक्कम अरबाज पठाणने कंपनीच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
७९ महिलांची फसवणूक आणि गुन्हा दाखल
महिला बचत गट अत्यंत विश्वासाने आणि कष्टाने गोळा केलेले हप्ते वेळेवर भरत असताना, अरबाज पठाणने मात्र या पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली. केज येथील कंपनीचे शाखाधिकारी श्रीहरी मुळे यांनी बुधवारी (२९) केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून, क्षेत्रीय अधिकारी अरबाज रशीदखाँ पठाण याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (कलम ४०६, ४२०) नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपहारामुळे अल्पबचत गटातील महिलांना भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी येण्याची भीती व्यक्त होत आहे.