'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:46 IST2024-12-12T16:43:23+5:302024-12-12T16:46:23+5:30
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे; धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी
परळी (बीड) : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सामाजिक कार्यकर्ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केली जावी. तसेच हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जावे, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे केली आहे. गुरुवारी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना याविषयी आपले मत व्यक्त केले.
आमदार धनंजय मुंडे पुढे म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी व गंभीर स्वरूपाचे आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी ही समाज विघातक असून अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे, यासाठी या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे असे, मत आमदार मुंडे यांनी व्यक्त केले. तसेच गुन्हेगारी ही एक अपप्रवृत्ती आहे, तिला जात नसते, मात्र या प्रकरणाचा आडून काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. या माध्यमातून काहीजण राजकीय लाभ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
नाहक बीड जिल्ह्याची बदनामी करू नये
पवनचक्कीच्या संदर्भातील कामाच्या वादातून ही हत्या झाल्याचे समजते, मात्र जाणीवपूर्वक याआडून बीड जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा तसेच न्यायव्यवस्था या माध्यमातून संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल, कुणीही नाहक जिल्ह्याची बदनामी करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले आहे.