खिळखिळ्या,भंगार बसचा प्रवाशांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST2021-03-21T04:31:50+5:302021-03-21T04:31:50+5:30

अंबाजोगाई : एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ सातत्याने केली जात असली तरी राज्य परिवहन महामंडळाच्या खिळखिळ्या व भंगार बसगाड्या ...

Crashing, wrecking bus troubles to passengers | खिळखिळ्या,भंगार बसचा प्रवाशांना त्रास

खिळखिळ्या,भंगार बसचा प्रवाशांना त्रास

अंबाजोगाई : एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ सातत्याने केली जात असली तरी राज्य परिवहन महामंडळाच्या खिळखिळ्या व भंगार बसगाड्या प्रवाशांच्या जीवावर उठल्या आहेत. अनेकदा या बसगाड्या तांत्रिक बिघाडामुळे बंद पडतात. तर कधी अपघातग्रस्त होतात. कित्येक बसगाड्यांमध्ये मोडके आसन आहेत तर कुठे आसनाचा पत्ता नाही. रस्त्यातच बंद पडत असलेल्या या बसेस प्रवाशांना ढकलाव्या लागत आहेत. त्यामुळे या सरकरी वाहनातून प्रवास करायचा तरी कसा,हा प्रश्न अनेकांना पडत आहे. याचा त्रास प्रवाशांसह वाहक चालकांनाही सहन करायची वेळ आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. उत्पन्न भरपूर मिळत असले तरी प्रवाशांच्या सोयीकडे महामंडळ अजिबात लक्ष देत नाही, असा आरोप प्रवाशांकडून नेहमीच होत आहे.

काही दिवसांपूर्वी बसगाडीचे एक चाक निखळल्याची घटना परळी येथे घडली होती. दोन युवकांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने अनेक प्रवाशांचा जीव वाचला. महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची दुरुस्ती व्यवस्थितरीत्या होत नाही. स्वच्छतेच्या बाबतीतही फार वाईट अवस्था आहे. या बसगाड्या धुळीने माखलेल्या असतात. बसमध्ये खिडकीच्या कोपऱ्यात थुंकून घाण केलेले असते आजूबाजूला तशीच घाण पडलेली आढळून येते.

तसेच बसगाड्यांच्या खुर्च्या निखळल्या आहेत. काही बसगाड्यांच्या खुर्च्याच नाहीत. एकूणच सगळी गैरसोय होत असून आता जीवाचाही धोका निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. बसगाड्यांमध्ये सुविधा पुरवून आणि काळानुसार बदलण्याऐवजी महामंडळाने ज्या आगाराचे उत्पन्न कमी आहे. तेथील वाहक चालकांच्या वेतनात कपात करण्याचे धोरण आणल्याने याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

खासगी वाहनांची मोठी स्पर्धा

बदलत्या काळाची पावले ओळखून परिवहन महामंडळाने आपल्या धोरणात व बसगाड्यात फारसे बदल केले नाहीत. खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी हीच कमजोरी ओळखत अत्याधुनिक सुविधांनी युक्त वाहने प्रवाशांच्या दिमतीला उभी केली. महामंडळाने शिवशाहीसारखी सुसज्ज बस आणली. परंतु या बसचे तिकीट प्रवाशांच्या खिशाला परवडणारे नाही काही महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात बसमध्ये वायफायद्वारे बुट अ‍ॅपची सुविधा दिली होती. आता बहुतांश बसगाड्यातून या सुविधेचे डबेच अदृश्य झाले आहेत. मग खासगी ट्रॅव्हल्सशी कशी स्पर्धा करणार आणि प्रवाशांना कसे आकर्षित करणार हा अनुत्तरीत प्रश्न आहे.

परिवहन विभागाची परवानगी कशी

अंबाजोगाई आगारातील भंगार अवस्थेतील दहा ते पंधरा बसगाड्या धावताना दिसत आहेत. अनेकदा बसगाड्यांचे चालकही भंगार वाहने भरधाव चालवतात. या बस काही वेळेस रस्त्यातच बंद पडतात. अशा वेळी प्रवाशांना धक्का मारून बस चालू करावी लागते. कित्येक बसगाड्या रस्त्यावर धावण्याच्या लायकीच्या नाहीत तर उपप्रादेशिक परिवहन विभाग या बसगाड्यांना रस्त्यावर उतरण्याची परवानगी कशी देते याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Crashing, wrecking bus troubles to passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.