coronavirus : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:56 PM2020-05-26T18:56:50+5:302020-05-26T18:57:50+5:30

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात.

coronavirus: Move of 50 doctors from SRT Hospital, Ambajogai to Mumbai | coronavirus : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याच्या हालचाली

coronavirus : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याच्या हालचाली

googlenewsNext
ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभागाने मागवली माहिती

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हालविण्याचा घाट शासनाने घातला आहे. हे डॉक्टर जर मुंबईला प्रतिनियुक्तीवर गेले तर अंबाजोगाईतील रुग्णालय ओस पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. अगोदरच अपुऱ्या मनुष्य बळावर सुरू असलेल्या या रुग्णालयाला डॉक्टरांची नितांत आवश्यकता आहे. अशा स्थितीत इथून पुन्हा ५० डॉक्टर हलवले तर रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात. त्यांना चांगले उपचारही मिळतात. रुग्णालयाची दररोजची बाह्यरुग्ण विभागाची रुग्णसंख्या १८०० ते २००० असते. तर निवासी उपचार घेणाऱ्यांची संख्या ७०० ते ७५० असते. अशा स्थितीत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी आहे या मनुष्यबळावर रुग्णालयाचा गाडा ओढत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या रोडावली असली तरी हे रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी मोठे आधार केंद्र बनलेले आहे. रुग्णालयात सध्या वैद्यकीय शिक्षक, डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या ३५ टक्के जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भराव्यात यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. लातूर येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर अंबाजोगाईतील अनेक तज्ञ डॉक्टर लातूर येथे हलविण्यात आले. त्यानंतरही या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. अशी स्थिती असतांनाही वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालायातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याचा घाट घातला आहे. वैद्यकीय शिक्षण संचालकांनी या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली आहे. 

अंबाजोागईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय निर्माण करण्यात आले आहे. या  कामासाठी आणखी डॉक्टरांची आवश्यकता असतांना अंबाजोगाईतील रिक्त जागा भरण्यासाठी शासन अंबाजोगाईतील डॉक्टरांना मुंबईकडे हलविण्याचा घाट घालत आहे.  जर येथील डॉक्टर मोठ्या प्रमाणात मुंबईला रुजू झाले तर अंबाजोगाईच्या रुग्णालयात रुग्णसेवेसाठी मोठा अडसर ठरणार आहे. अगोदरच अंबाजोगाईत महानगरातून येण्यासाठी डॉक्टर धजावत नाहीत. जे इथे राहून सेवा देतात त्यांनाही हलवाचे म्हटले तर हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आगामी काळात ओस पडेल व मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा खंडित होऊ शकते. आहे या सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मोठा ताण निर्माण होऊ शकतो. 

माहिती देण्यास नकार
स्वा.रा.ती. रुग्णालयातील ५० डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मुंबई येथे होणार आहे का? यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही. 

अंबाजोगाईतील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मुंबईला करू नये - आ. नमिता मुंदडा
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबतची माहिती मागविली असल्याचे समजते. अंबाजोगाई हे गोरगरीब रुग्णांसाठी आधारकेंद्र असलेले रुग्णालय आहे. सामान्य रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणाऱ्या या रुग्णालयामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो. या रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी एका निवेदनाद्वारे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

Web Title: coronavirus: Move of 50 doctors from SRT Hospital, Ambajogai to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.