कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीड जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली आहे. मंगळवारी जिल्ह्यात दोघांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात सुकळी (ता. धारूर) येथील ४० वर्षीय महिला व समनापूर (ता. बीड) येथील ४९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच मंगळवारी जिल्ह्यातील २ हजार ६२५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील २ हजार ३४२ अहवाल निगेटिव्ह आले, तर २८३ पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ९४ रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात ५८, आष्टी व गेवराई तालुक्यात प्रत्येकी १५, धारूर ५, माजलगाव ४१, परळी २४, पाटोदा १०, शिरूर ३ आणि वडवणी तालुक्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २० हजार ९५८ इतका झाला आहे, पैकी १९ हजार ३०६ जणांनी कोरोनावर मात केली असून, ५९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
१९ ठिकाणी बाधितांवर उपचार
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून खाटांची संख्या वाढवली जात आहे. तूर्तास जिल्ह्यात १९ ठिकाणी कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णालयांत २ हजार ११३ खाटा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी सध्या केवळ १ हजार ४१३ खाटा आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांव्यतिरिक्त ४३६ खाटा शिल्लक आहेत. आरोग्य विभागाने ही माहिती दिली.