आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; महिनाभरात १० अपघातात ४ जणांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 16:46 IST2021-01-10T16:35:16+5:302021-01-10T16:46:50+5:30
महिनाभरात एकूण १० अपघात ४ बळी जाऊन अनेकजण अधू झाले आहेत.

आष्टी-कडा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; महिनाभरात १० अपघातात ४ जणांनी गमावला जीव
- अविनाश कदम
आष्टी : बीड - आष्टी - अहमदनगर मार्गावर शुक्रवार दि.८ रोजी पोखरी गावाजवळ दुचाकी चारचाकी धडकेत पती जागीच ठार तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सकाळी आष्टी शहराजवळील हंबर्डे काॅलेजजवळ आतिश उबाळे (२२) हे घराकडून आष्टी येथील पंपावर कामाला जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली. दरम्यान, या मार्गावर डिसेंबरपासून आजपर्यंतचा हा ११ वा अपघात ठरला आहे.
चालकांचा वेगावर अंकुश नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहन चालक यामार्गावर बेभान वाहने चालवताना दिसून येतात. तालुक्यातील पांढरी येथील युवक आतिश उबाळे ( २२ ) नाथ पेट्रोल पंपावर सकाळी घराकडून दुचाकीवर ( क्रं.MH23A6611 ) जात असताना नगरहून बीडमार्गे जात असलेल्या चारचाकीने (क्रं. MH09BB0012 ) जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी आतिश उबाळे याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, यामार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. चिंचपूर - आष्टी - कडा २७ किलोमीटर अंतरावर डिसेंबर ते आजपर्यंत १० मोठ्या अपघातात ४ जणांचा अपघातात जीव गमावावा लागला असून अनकेजण गंभीर जखमी होऊन अधू झालेले आहेत. यामुळे या रस्त्यावर गतिरोधक टाकून वेगाला मर्यादा घालाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वाढत्या अपघातांना ब्रेक लावा
नवीन रस्ता असल्याने वाहनचालक अधिक वेगाने गाडी चालवत आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने प्रशासनाने हे गांभीर्याने घ्यावे.
- राम नागरगोजे सामाजिक कार्यकर्ते
वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूकीच्या नियमांचे पालन करून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.
- सलीम चाऊस, पोलिस निरीक्षक, आष्टी