राखेच्या धुळीमुळे कार- जीपचा अपघात; एक ठार, १२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:25 IST2023-01-12T16:24:58+5:302023-01-12T16:25:12+5:30
दाऊतपूर शिवारातून राखतळ्याची राख वाहून नेणे दिवस- रात्र चालूच आहे

राखेच्या धुळीमुळे कार- जीपचा अपघात; एक ठार, १२ जखमी
परळी (जि. बीड) : तालुक्यातील परळी- गंगाखेड रस्त्यावरील दादाहारी वडगावजवळ मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कार व जीपच्या भीषण अपघात झाला. यात एक ठार झाला तर १२ जण जखमी झाले. राखेच्या धुळीमुळे चालकांना अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
परळी येथून दादाहारी वडगावकडे निघालेली कार (एमएच २६ एके २६२६) व कार (एमएच २० इजे १०८४) या जीपचा भीषण अपघात झाला. यात वडगाव येथील कारचालक किशन इंगळे (३२) जागीच ठार झाला तर जीपमधील १२ जण जखमी झाले. जखमींना अंबाजोगाई व लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दाऊतपूर शिवारातून राखतळ्याची राख वाहून नेणे दिवस- रात्र चालूच आहे ही राख परळी- गंगाखेड रस्त्यावर पडून इतर वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. राखेमुळे रस्त्यावर धुरळा उडत असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांना अंदाज येत नाही, त्यामुळे या मार्गावर अपघात वाढले आहेत. अपघाताचा धोका असतानाही संबंधित यंत्रणा मात्र मूग गळून गप्प आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.