पाटोद्यात तहसील कर्मचाऱ्यांना कोंडून जप्त केलेले टिप्पर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST2018-04-13T00:55:27+5:302018-04-13T00:55:27+5:30

पाटोद्यात तहसील कर्मचाऱ्यांना कोंडून जप्त केलेले टिप्पर पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी मंगळवारी रात्री बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर जवळाला शिवारातून जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले होते. मात्र, निर्ढावलेल्या वाळू माफियांनी मध्यरात्रीच्या सुमारास चक्क तहसीलच्या कर्मचाºयांना कार्यालयात कोंडून जप्त केलेले टिप्पर जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना पाटोद्यात घडली. याप्रकरणी तहसीलदार चित्रक यांच्या फिर्यादीवरून टिप्पर मालक आणि चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
१० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तहसीलदार रूपा चित्रक या बीडमधील शासकीय कामकाज आटोपून माघारी पाटोद्याकडे निघाल्या होत्या. येताना रात्री ९.२० वाजताच्या सुमारास जवळाला शिवारात त्यांना एक हायवा टिपर (एमएच २३ डब्ल्यू ४००९) बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करताना आढळून आले. तहसीलदार चित्रक यांनी सदर टिप्पर थांबवून कागदपत्रे आणि परवान्याबाबत विचारणा केली असता टिप्पर मालक भाऊसाहेब खांडेकर याने घटनास्थळी येत परवाना नसल्याचे सांगितले.
त्यामुळे चित्रक यांनी टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले आणि रात्रपाळीवर असणाºया कोतवालाकडे ताबा देऊन चावी घेऊन निघून गेल्या. त्यानंतर मध्यरात्री १.४० वाजताच्या सुमारास टिप्पर मालक खांडेकर आणि चालक अमोल या दोघांनी कोतवाल सी.डी. चौरे आणि राहुल गिरी हे दोघे जुन्या तहसील कार्यालयात असताना त्यांना धाक दाखवून आणि धमक्या देत मुख्य दरवाजा बाहेरून लावला आणि जप्त केलेले टिप्पर घेऊन पळून गेले. याप्रकरणी तहसीलदार चित्रक यांच्या फिर्यादीवरून टिप्पर मालक भाऊसाहेब खांडेकर आणि चालक अमोल या दोघांवर पाटोदा पोलिसांत कलम ३७९, ३४१, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.