गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:15 IST2020-02-19T00:14:24+5:302020-02-19T00:15:32+5:30
येथील सोन्या-चांदीचे व्यापारी अमर वसंतराव देशमुख व चुलत भाऊ गोविंद चंद्रकांत देशमुख यांच्यावर सोमवारी दुपारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गणेश दिलीप कराड, शाम कराड, लालू कराड (रा इंजेगाव), मंचक गिते (रा बेलंबा) यांच्यासह इतर पाच लोकांविरुद्ध मंगळवारी पहाटे गुन्हे दाखल केले असून, मंगळवारी या चौघांना अटक केली.

गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले
संजय खाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील सोन्या-चांदीचे व्यापारी अमर वसंतराव देशमुख व चुलत भाऊ गोविंद चंद्रकांत देशमुख यांच्यावर सोमवारी दुपारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गणेश दिलीप कराड, शाम कराड, लालू कराड (रा इंजेगाव), मंचक गिते (रा बेलंबा) यांच्यासह इतर पाच लोकांविरुद्ध मंगळवारी पहाटे गुन्हे दाखल केले असून, मंगळवारी या चौघांना अटक केली.
देशमुख बंधूंवर केलेल्या हल्ल्यात आरोपींनी चाकू, लोखंडी रॉडचा वापर केला आहे. जखमीवर अंबाजोगाईच्या शासकीय रु ग्णालयात उपचार चालू आहेत. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक चांद मेंडके, डी बी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी जखमींची भेट घेतली आहे व जखमी अमर देशमुख यांचा जबाब नोंदविला आहे. जवाब घेऊन गणेश कराडसह इतर आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार हे करीत आहेत. येथील वैद्यनाथ मंदिर रोडवरील नगर परिषद कार्यालयासमोर असलेला व्यंकटेश वैजनाथ डुबे यांचा प्लॉट अमरचा भाऊ अभिजित वसंतराव देशमुख यांनी खरेदी केला आहे. त्याची रजिस्ट्री झाली आहे. सदरील प्लॉटचे काही पैसे देणे बाकी आहेत. तसेच गणेश कराड यांच्यासोबत व्यंकटेश डुबे यांनी ही व्यवहार केला आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास खरेदी केलेल्या प्लॉटवर अमर देशमुख व विजय भुतडा हे दोघे मित्र पत्र्याचे कंपाउंड वॉल करण्यासाठी गेले होते. तेथे गणेश कराड व त्याचा एक मित्र आला व या प्लॉटचे उरलेले २५ लाख रुपये आम्हाला दे नाही तर तुला जिवे ठार मारीन. मी उद्या तुझ्याकडे येतो. तू पैसे तयार ठेव, अशी धमकी दिली. प्लॉट हा व्यंकटेश डुबे यांच्याकडून खरेदी केला आहे. पैशाचा व्यवहार आम्ही दोघे बघून घेऊ, असे अमर देशमुख यांनी गणेश कराड यांना सांगितले व तिथून ते निघून गेले.
दुस-या दिवशी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अमर देशमुख हे त्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात बसलेले होते. तेथे गणेश दिलीप कराड, श्याम कराड, लालू कराड (रा इंजेगाव) व मंचक गिते (रा बेलंबा) आणि गित्ते यांचा चुलता असे पाच जण व इतर काही जण आले. पैशाच्या देण्याघेण्यावरून वाद झाला. यावरून गणेश कराड यांनी त्याच्या जवळील चाकू काढून ‘थांब साल्या, तू पैसे कसे देत नाहीस, तुला जिवे मारून टाकतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने अमर देशमुख यांच्या पोटात चाकू मारला. त्यांनी उजव्या हाताने चुकविला. चाकू देशमुख यांच्या उजव्या हाताला लागून कमरेच्या बेल्टला लागून पॅन्ट फाटली आहे . यावेळी तेथे त्यांचा भाऊ गोविंद चंद्रकांत देशमुख, रणजित वसंतराव देशमुख हे तेथे आले असता मंचक गिते यांनी हातातील लोखंडी रॉड गोविंद देशमुख यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच रणजित देशमुख यांच्या पाठीत मंचक गीते यांनी काठीने मारहाण करून जखमी केले. श्याम कराड, लालू कराड, इतर लोकांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी अमर देशमुखसह तिघांना मारहाण केली. त्यामध्ये अमरचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. गणेश दिलीप कराड यांनी गळ्यातील ३ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट काढून घेतले. यावेळी काहींनी भांडण सोडण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात असा जबाब अमर देशमुख यांनी संभाजीनगर पोलिसात नोंदविला.
कोणाची गय केली जाणार नाही : धनंजय मुंडे
बीड : परळी येथील व्यापारी व अन्य काही जणांमध्ये आपसात झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित आरोपींवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे, अशा घटनेमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
परळी येथील व्यापारी, नागरिक सगळेच जण माझे निकटवर्तीय आहेत, जवळचा किंवा दूरचा असे काही नाही. दोघांच्या वादात कुणीही कायदा हातात घेणार असेल, तर त्याची गय मी करणार नाही. कोणत्याच परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली मी खपवून घेणार नाही, असेही मुंडे म्हणाले. व्यक्तिगत भांडणांमध्ये माझे नाव जोडून अशा प्रकारची बदनामी करू नये, असे आवाहनही मुंडेंनी केले आहे.
गुंडांचे आत्मबल वाढवणारे पालकत्व बीडला मिळाले, हे जिल्ह्याचे दुर्दैव : पंकजा मुंडे
बीड : परळीत गुंडागर्दी, हप्तेखोरी, माफिया राज करायचे आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल झाल्यावर मग गय करणार नाही, अशी भाषा करायची, हे दुटप्पी धोरण.. गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं, हे दुर्दैव असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर केली आहे. गेल्या काही दिवसांत परळीत मारहाण, हल्ल्याचे प्रकार घडले. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेत यावर ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय, जनतेने केलेला बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे..अशी टीका पंकजा यांनी केली आहे.