शेतातून परताना दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 17:57 IST2023-10-19T17:55:12+5:302023-10-19T17:57:15+5:30
पळसखेडा शिवारातील खटकळी नदीच्या पुलावर झाला अपघात

शेतातून परताना दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : बोरी सावरगाव ते आंबेजोगाई महामार्गावरील पळसखेडा शिवारातील पुलावर अज्ञात वाहनाने समोरील दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्री साडे अकरा वाजता झाला. रामप्रसाद गुळभिले आणि वासुदेव देशपांडे अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
केज तालुक्यातील दिपेवडगाव येथील रामप्रसाद भाऊसाहेब गुळभिले ( 37) आणि वासुदेव अनंत देशपांडे ( 43) हे दोघे जण आपल्या कानडी बदन शिवारातील शेतातून बुधवारी रात्री साडे अकरा वाजता गावात दुचाकीवरुन परतत होते. पळसखेडा शिवारातील खटकळी नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक देत वाहन निघून गेले. धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचे पुढचे टायर तुटून पडले आणि रामप्रसाद गुळभिले आणि वासुदेव देशपांडे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दीपेवडगाव येथील भगवान शेषेराव गुळभीले,कृष्णा औटे व सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी दोघांनाही रुग्णवाहिकेतून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी (दि.19) पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रामप्रसाद गुळभिले आणि वासुदेव देशपांडे यांना मृत घोषित केले.
दुपारी 12 वाजेच्या दरम्यान दोघांच्याही पार्थीवावर दीपेवडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास तुपारे आणि जमादार सिरसट करीत आहेत.रामप्रसाद गुळभीले यांच्या पश्चात आई वडील,पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे.तर वासुदेव देशपांडेच्या पश्चात आईवडील, दोन भाऊ,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एकाच वेळी दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.