मोठी बातमी: वाल्मीक कराडच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची CID कडून कसून चौकशी
By सोमनाथ खताळ | Updated: December 27, 2024 22:29 IST2024-12-27T22:28:38+5:302024-12-27T22:29:50+5:30
सीआयडीकडून तपास : जिल्हाध्यक्षांना लातूरवरून पोलिस वाहनातून आणले बीडला.

मोठी बातमी: वाल्मीक कराडच्या पत्नीसह राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाची CID कडून कसून चौकशी
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवणचक्कीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची पत्नी मंजीली कराड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सीआयडीने शुक्रवारी साडे नऊवाजेपर्यंत चौकशी केली. जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना तर लातूरहून पोलिस वाहनातून बीडला आणण्यात आले होते. त्यांना आता शनिवारी पुन्हा हजर राहण्याची नोटीस दिल्याची माहिती आहे.
केज तालुक्यात पवणचक्की उभारणीचे काम करणाऱ्या अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सुनिल केदु शिंदे (वय ४२ रा.नाशिक ह.मु.बीड) यांना दोन काेटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड (रा. परळी), विष्णु चाटे (रा. कौडगाव ता. केज) व सुदर्शन घुले (रा. टाकळी ता. केज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सध्या सीआयडी करत आहे. सध्या केवळ विष्णू चाटे हा एकमेव आरोपी अटक असून त्याला शुक्रवारी न्यायालयाने ११ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला इतर आरोपी अजूनही मोकाटच आहेत. याच गुन्ह्यातील चाटे आणि घुले यांचा मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातही समावेश आहे. त्यामुळे या खंडणीच्या प्रकरणाकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. याच खंडणीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दुपारी मंजीली वाल्मीक कराड यांना परळी येथून बोलावून घेतले. तर जिल्हाध्यक्ष चव्हाण यांना लातूर येथील घरून सीआयडीच्या पथकाने बीडला आणले.
या दोघांचीही चौकशी बीड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आले. साडे आठ वाजता कराड यांना तर साडे नऊ वाजता चव्हाण यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. त्यांना पुन्हा शनिवारी हजर राहण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
सीआयडीचे अधिकारी ठाण मांडून
सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बोरडे, उपमहानिरीक्षक बसवराज तेली आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे शुक्रवारी दिवसभर बीडमध्ये ठाण मांडून होते. या तिनही अधिकाऱ्यांनी कराड व चव्हाण यांची चौकशी केली. रात्री साडे नऊवाजेच्या सुमारास सर्व अधिकारी शहर पोलिस ठाण्याबाहेर पडले. पाटील यांना याबाबत विचारल्यावर नो कॉमेंटस असे म्हणून त्यांनी माध्यमांना बोलणे टाळले.
पोलिस अंगरक्षकांचीही चौकशी?
वाल्मीक कराड यांचे पोलिस अंगरक्षक असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनाही सीआयडीच्या पथकाने बीड शहर पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यांची चौकशी केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे मोबाईल जप्त करून व्हाट्सअप डाटा रिकव्हर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधीक्षक पाटील यांना विचारल्यावर त्यांनी बोलणे टाळले, त्यामुळे याला दुजोरा मिळाला नाही.