मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 22:07 IST2025-01-15T22:05:29+5:302025-01-15T22:07:51+5:30
Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना
Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल.ताहलियानी ही एत सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ताहलियानी यांनी या आधी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
तसेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी परभणी हिंसाचारावेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचाही तपास करणार आहेत. या दोन्ही समित्या पुढील सहा महिन्यात अहवाल देणार आहेत.
हिवाळी अधिवेशनात या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी करणार असल्याचेही सांगितले होते. दरम्यान, आता न्यायालयीन चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड मध्ये असणार आहे, या प्रकरणी चौकशी समितीला कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार असणार आहे.
ताहलियानी यांनी मुंबई २६/११ बॉम्ब हल्ल्याच्या खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे, तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश म्हणून होते. तहलियानी हे निवृत्त झाले आहेत, पण राज्य सरकारने त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली आहे.
एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले
पवनचक्की कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या लाच प्रकरणात संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. काल कराड याच्याविरोधात मकोका गुन्हा दाखल केला, आता एसआयटीने कराड याचा सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज एसआयटीने वाल्मीक कराड याला कोर्टासमोर आणले. यावेळी एसआयटीने वाल्मीक कराड याच्याबाबत सात मोठे दावे केले आहेत. यामुळे आता कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
वाल्मीक कराड याला आज एसआयटीने कोर्टात हजर केले. यावेळी एसआयटीने कोर्टाला महत्वाची माहिती दिली, खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगितले. ही हत्या खंडणी प्रकरणामुळेच झाल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला. पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्यात अडथळा ठरल्या प्रकरणी ही हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला.