मोठी बातमी: सुदर्शन घुलेविरोधात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती; SITकडून कोठडीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:27 IST2025-01-27T14:26:43+5:302025-01-27T14:27:29+5:30
सुदर्शन घुलेविरोधातील आणखी पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणात नवी कोणती माहिती उजेडात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोठी बातमी: सुदर्शन घुलेविरोधात आणखी पुरावे पोलिसांच्या हाती; SITकडून कोठडीची मागणी
Beed Murder Case: केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्याविरोधातील आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. घुलेची पुन्हा चौकशी करायची असल्याने त्याची कोठडी मिळावी, यासाठी आता एसआयटीकडून बीड कोर्टात अर्ज करण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या झाली होती. यात सुदर्शन घुले, विष्णू चाटेसह आठ जण अगोदर आरोपी होते. त्या सर्वांवर मकोका लावला होता. परंतु, नंतर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचादेखील यात सहभाग आढळून आल्याने त्याच्यावरही खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकूण नऊ आरोपींवर मकोका लागला असून, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मकोका लावताना सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा प्रमुख केले आहे, तर वाल्मीक कराड हा सदस्य असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुलेविरोधातील आणखी पुरावे एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणात नवी कोणती माहिती उजेडात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, बीड कोर्टात एसआयटीकडून सुदर्शन घुलेची कोठडी मागण्यात आल्याने कोर्टाकडून काय निर्णय देण्यात येतो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
आरोपींवर यापूर्वी किती गुन्हे दाखल?
सुदर्शन घुले - १९
वाल्मीक कराड - १५
कृष्णा आंधळे - ६
महेश केदार - ६
प्रतीक घुले - ५
जयराम चाटे - ३
विष्णू चाटे - २
सुधीर सांगळे - २