पानटपरीतील स्फोटाने जवळगावात खळबळ; पत्रे उडाली, जमिनीत पडला मोठा खड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:05 IST2024-04-09T18:05:24+5:302024-04-09T18:05:39+5:30
या स्फोटात टपरीचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत

पानटपरीतील स्फोटाने जवळगावात खळबळ; पत्रे उडाली, जमिनीत पडला मोठा खड्डा
अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव येथे सोमवारी रात्री एका पानटपरीत स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. यात टपरी चालक जखमी झाला आहे. स्फोटाच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटना स्थळाला भेट दिली.
जवळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशोक सुभाष भालेराव (३२) यांची पानटपरी आहे. सोमवारी रात्री ८.३० वाजता टपरीत अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात टपरीचे वरचे पत्रे उडून गेले. तर जमिनीत मोठा खड्डा पडला. यात टपरी चालक
अशोक भालेराव हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
स्फोटात टपरीचे जवळपास २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. दरम्यान, पाठीमागील शेतातून एक वायर टपरीमध्ये आणून सोडल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.