बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:34 IST2025-08-22T17:33:40+5:302025-08-22T17:34:19+5:30
सरकारी वकिलाने कोर्टात जीवन संपवल्यानंतर दोन दिवसांनी वडवणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
बीड : येथील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एका न्यायाधीशावर आणि लिपीकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळाचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल (१९) यांनी वडवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील जानेवारी २०२५ मध्ये एमपीएससी परीक्षेद्वारे सरकारी वकील म्हणून वडवणी न्यायालयात रूजू झाले होते. जून २०२५ पासून वडवणी कोर्टातील नवनियुक्त न्यायाधीश रफीक शेख आणि लिपीक आण्णासाहेब तायडे हे त्यांना विनाकारण मानसिक त्रास देत होते. कामामध्ये अपमानित करणे, मनमानी काम करणे आणि त्यांचे म्हणणे न ऐकल्यामुळे ते सतत चिंताग्रस्त राहत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे विश्वजित याने म्हटले आहे.
दोन दिवसानंतर गुन्हा दाखल
२० ऑगस्ट रोजी सकाळी चंदेल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतू त्यात न्यायाधिशांचे नाव असल्याने वडवणी पोलिसांकडून ही माहिती दडविण्यात आली होती. शिवाय विनायक यांचा मुलगा विश्वजीत यानेही पोलिसांवर गुरूवारी आरोप केला होता. या प्रकरणावर माध्यमांनी प्रकाश टाकल्यावर शुक्रवारी दुपारी ३:४७ वाजता गुन्हा दाखल झाला. नातेवाईकच तक्रार द्यायला येत नव्हता, असा खुलासा पोलिसांनी केला असला तरी विश्वजीत यांच्या आरोपामुळे त्यात किती तथ्य? याबाबत संशय व्यक्त होत आहे.