बीडच्या लेकीचा पुण्यात छळ; मुलगी जन्मली म्हणून घराबाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 20:12 IST2025-06-07T20:12:06+5:302025-06-07T20:12:06+5:30

चारित्र्यावरही संशय : पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

Beed women harassed in Pune; thrown out of house because she gave birth to a girl | बीडच्या लेकीचा पुण्यात छळ; मुलगी जन्मली म्हणून घराबाहेर काढले

बीडच्या लेकीचा पुण्यात छळ; मुलगी जन्मली म्हणून घराबाहेर काढले

बीड : आधी चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर समजूत काढून नांदायला पाठविले. यादरम्यान विवाहिता गर्भवती राहिली. तिने एका गोंडस मुलीला जन्मही दिला. परंतु, “तुला मुलगी कशी जन्मली, आम्हाला मुलगा हवा होता,” म्हणत बीडमधील लेकीचा पुण्यातील सासरच्या लोकांनी छळ केला. त्यानंतर तिला मुलीसह घराबाहेर काढले. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता हा एक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सुनीता (नाव बदलले - वय ३०, रा. पुणे, ह.मु. बीड) हिचा पुण्यातील सोहम (नाव बदलले) याच्यासोबत १ जून २०२१ रोजी विवाह झाला. सर्व मानपान आणि संसारोपयोगी साहित्यही दिले. विवाहानंतर सहा महिने सुनीताला सुखाने नांदवले; पण, त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू झाला. काही दिवस सहन केल्यानंतर सुनीताने या त्रासाबद्दल ४ फेब्रुवारी २०२२ रोजी आई-वडील व भावाला माहिती दिली. ते पुण्याला गेले आणि सुनीताला बीडला घेऊन आले. त्यानंतर काही दिवसांनी सुनीताच्या माहेरच्या लाेकांना पुण्यात बोलावून घेतले. मिटविण्यासाठी बैठक झाली. त्यानंतर १३ मार्च २०२३ रोजी सुनीताला सासरी नेऊन सोडले. पुन्हा चार महिने सुखाने नांदविले. याच दरम्यान सुनीता गर्भवती राहिली. तरीही शारीरिक व मानसिक त्रास कमी झाला नाही.

परंतु, गर्भवती असल्याने तिने हे सर्व सहन केले. त्यानंतर २५ जानेवारी २०२४ रोजी सुनीताची प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु, सासरचे यामुळे नाराज झाले. आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी कशी झाली? म्हणून त्रास दिला. उपाशीपोटी ठेवले. हे प्रकार वाढतच गेले आणि २३ मे २०२५ रोजी सुनीताला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले. त्यामुळे ती माहेरी आली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुलीचा खर्च कोण करणार?
तुला मुलगी झाली आहे, आता या मुलीच्या पालन, पोषणाचा व शिक्षणाचा खर्च कोण करणार, असा सवाल तिला विचारला जात होता. सुनीतासोबतच चिमुकल्या मुलीचाही छळ केला जात होता. हाच त्रास असह्य झाल्याने सुनीताने पुण्यावरून बीड गाठले.

Web Title: Beed women harassed in Pune; thrown out of house because she gave birth to a girl