बीड ते पश्चिम बंगाल; व्हॉट्सॲपवर व्हिडीओ आला अन् ३१ वर्षांनी चुलता सापडला

By सोमनाथ खताळ | Published: December 10, 2022 04:44 PM2022-12-10T16:44:25+5:302022-12-10T16:45:19+5:30

कामासाठी गाव सोडलेल्या चुलत्याला आणण्यासाठी पुतण्यांनी गाठले पश्चिम बंगाल

Beed to West Bengal; The video came on WhatsApp and the Uncle was found after 31 years | बीड ते पश्चिम बंगाल; व्हॉट्सॲपवर व्हिडीओ आला अन् ३१ वर्षांनी चुलता सापडला

बीड ते पश्चिम बंगाल; व्हॉट्सॲपवर व्हिडीओ आला अन् ३१ वर्षांनी चुलता सापडला

Next

- सोमनाथ खताळ
बीड :
पाच भाऊ आणि चार बहिणी. परिस्थिती हलाखीची असल्याने कोणलाही न सांगता २१ व्या वर्षी कामासाठी गाव सोडले. तब्बल ३१ वर्षे हॉटेलवर वेटर म्हणून काम केले; परंतु एका कोल्हापूरच्या व्यक्तीने तयार केलेल्या व्हिडीओने नातेवाइकांना चार दिवसांपूर्वी माहिती मिळाली. पुतण्यांनी कसलाही विचार न करता २ हजार किमीचा प्रवास करत पश्चिम बंगाल गाठले. शुक्रवारी दुपारी ३ वाजता ते बंगालहून बीडच्या दिशेने निघाले आहेत. सोमवारपर्यंत ते घरी येणार असून, पाहण्यासाठी नातेवाइकांचे डोळे आतूर झाले आहेत.

रमेश माणिकराव उबाळे (वय ५१, रा. चऱ्हाटा, ता. बीड) असे या व्यक्तीचे नाव आहे. १९९१ साली रमेश यांनी घर साेडले होते. मुंबईतून एका रेल्वेत बसले आणि थेट पश्चिम बंगाल गाठले. येथील चिलगुडी येथील कृष्णा नावाच्या हॉटेलात वेटर म्हणून रोजंदारीवर काम सुरू केले. तब्बल ३१ वर्षे ते एकाच हॉटेलात राहिले. इकडे भाऊ नारायण उबाळे यांनी दोन वेळा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंतु शोध लागला नाही. अखेर कोल्हापूर येथील प्रकाश पानसरे नामक व्यक्ती मदतीसाठी धावून आला. पानसरे यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून, ते जेवणासाठी कृष्णा हॉटेलवर थांबले होते. त्यांनी विचारपूस केली असता ते उबाळे यांनी बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. त्यांनी रमेश उबाळे यांचा एक व्हिडीओ तयार केला. गुगलवरून चऱ्हाटा गाव शोधले. त्यांना एका पानटपरीचा संपर्क मिळाला. टपरीचालकाला फोन करून त्याच्या व्हाॅट्सॲपवर तो व्हिडीओ पाठवला. टपरीचालकानेही लगेच गावातील ग्रुप आणि सर्व उबाळे नावाच्या लाेकांपर्यंत तो पोहोचवला.

हा आपलाच भाऊ असल्याचे खात्री पटताच उबाळे बंधूंनी पानसरे यांना संपर्क करून हॉटेलचा पत्ता मिळवला. हॉटेलचालकाशी बोलून पोलिसांनाही कल्पना दिली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि. संतोष उबाळे यांनी पत्र दिल्यावर लगेच दत्ता व कैलास उबाळे हे दोन पुतणे चुलत्याला आणण्यासाठी तीन दिवसांपूर्वी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी रमेश उबाळे यांना सोबत घेऊन परतीचा मार्ग धरला आहे. ३१ वर्षांनी रमेश उबाळे परत येत असल्याने नातेवाइकांमध्ये आनंद असून, त्यांना पाहण्यासाठी सर्वच आतुर झाले आहेत.

झोपेतून उठताच दिसले पुतणे
शुक्रवारी पहाटे ३ वाजता दत्ता व कैलास हे पुतणे कृष्णा हॉटेलवर पोहोचले; परंतु ते झोपेत होते. त्यांच्या उठण्याची वाट त्यांनी पाहिली. सकाळी ६ वाजता डोळे उघडताच त्यांना आपले दोन्ही पुतणे दिसले. तोडकी मोडकी मराठी आणि हिंदी, बंगाली बोलणाऱ्या रमेश उबाळे यांनी पुतण्यांना चहापान करून लगेच पिशवी भरली. गावापासून २ हजार किमी दूर राहिलेले रमेश हे शुक्रवारी दुपारी पुतण्यांसोबत न्यू पायगुरी येथील रेल्वे स्थानकावरून परतीच्या दिशेने निघाले होते.

सर्व कुटुंब आनंदी आहे
साधारण १९९१ साली चुलते निघून गेल्याचे नातेवाईक सांगतात. कोल्हापूरमधील पानसरे यांनी केलेल्या व्हिडीओवरून शोध लागला. आता आम्ही प. बंगालमध्ये असून, चुलत्याला घेऊन परत निघालो आहोत. किमान दोन ते तीन दिवस आम्हाला लागतील. ३१ वर्षांनी चुलता परत येत असल्याने नातेवाईक, कुटुंबातील सर्वच लोक आनंदी आहेत.
- दत्ता उबाळे, चऱ्हाटा बीड

Web Title: Beed to West Bengal; The video came on WhatsApp and the Uncle was found after 31 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.