Beed: दरवाजा तोडून चोरटे घरात घुसले; धारदार शस्त्राच्या धाकावर लाखोंचे दागिने, रोकड लुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 19:30 IST2025-05-23T19:30:13+5:302025-05-23T19:30:38+5:30
केज तालुक्यातील माळेगाव येथील घटना

Beed: दरवाजा तोडून चोरटे घरात घुसले; धारदार शस्त्राच्या धाकावर लाखोंचे दागिने, रोकड लुटली
केज : तालुक्यातील माळेगाव येथील नवीन प्लॉटवरील वसाहतीत राहणाऱ्या आण्णा कोंडीबा चाळक यांच्या घराचे दार गुरुवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान तोडून तोंडाला कपडा बांधलेल्या चौघांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी पती, पत्नीला चाकूचा धाक दाखवून नगदी रोख 74 हजारासह एकूण 4 लाख 44 हजार रुपयांचे दागिने व ऐवज लुटला.
केज तालुक्यातील माळेगाव येथील प्लॉटवरील नवीन वसाहतीतराहणारे आण्णा कोंडीराम चाळक हे शेतकरी आपल्या घरात कुटुंबियांसह झोपले होते. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घराचे दार तोडून 25 ते 30 वयोगटातील चार अनोळखी तरुण तोंडाला रुमाल बांधून घरामध्ये घुसले. धारदार शस्त्राचा आण्णा चाळक व त्यांच्या पत्नीला धाक दाखवून कपाटात ठेवलेले एक तोळ्याचे झुंबर जोड, 7 ग्रॅमचा नेकलेस, 7 ग्रॅमचे मिनी गंठण, 5 ग्रॅमची सोन्याची ठुशी, 4 ग्रॅमचे मनी, मंगळसूत्र, 5 ग्रॅमची अंगठी आशा दागिन्यासह,नगदी रोख 74 हजार रुपये मिळून एकूण 4 लाख 44 हजार रुपयाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. या प्रकरणी अण्णा कोंडीराम चाळक यांच्या फिर्यादी वरून युसूफवाडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे करीत आहेत.
या प्रकरणी पावसाळी वातावरण असल्यामुळे श्वान पथका ऐवजी ठसे तज्ञाचे पथक पाचरण करण्यात आले होते. दरम्यान, माळेगाव येथील कपड्याच्या दुकानासह इतर दोन ठिकाणीही चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु त्याठिकाणचे नागरिक जागे झाल्यामुळे तेथील चोरीचा त्यांचा प्रयत्न फसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.