Beed: भोगलवाडी फाट्यावर बॅनर फाडल्याने तणाव; सहाजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:50 IST2025-09-08T19:49:37+5:302025-09-08T19:50:51+5:30
दोन समाजांत तेढ निर्माण होण्याचा प्रसंग ओढावत असताना दिंद्रुड पोलिसांनी दोन्ही समाज बांधवांना समजून सांगत दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Beed: भोगलवाडी फाट्यावर बॅनर फाडल्याने तणाव; सहाजणांवर गुन्हा दाखल
धारूर : गावाजवळील महालक्ष्मी प्रवेशद्वारावरील महापुरुष व देवांचे फोटो असलेले बॅनर फाडून त्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उभे बॅनर लावल्याचा प्रकार धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडला. याप्रकरणी दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बॅनर फाडून दोन समाजांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी कारी (ता. धारूर) गावातील सहाजणांवर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी सात वाजता भोगलवाडी येथील उपसरपंच तुकाराम तिडके हे मॉर्निंग वॉक करताना भोगलवाडी फाट्यावर आल्यांनतर त्यांना महालक्ष्मी प्रवेशद्वारावर देवदेवता, संत, महापुरुष यांचे असलेले बॅनर फाडून त्या खाली मनोज जरांगे यांचे उभे बॅनर लावताना ११ जण दिसले. याची माहिती त्यांनी दिंद्रुड पोलिसांना फोन करून माहिती दिली. बॅनरच्या कारणावरून सकाळी साडेसात वाजता दोन गटांत तणाव निर्माण झाला. दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी येथील उपसरपंच तुकाराम तिडके(रा. भोगलवाडी, ता. धारूर) यांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नितीन मोरे, परमेश्वर मोरे, राजेभाऊ मोरे, किरण मोरे, किशोर मोरे, रोहित मोरे अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास पीएसआय एस. एस. शेख हे करीत आहेत.
नवीन बॅनर पूर्ववत लावले
दोन समाजांत तेढ निर्माण होण्याचा प्रसंग ओढावत असताना दिंद्रुड पोलिसांनी दोन्ही समाज बांधवांना समजून सांगत दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर भोगलवाडी फाटा येथील ‘त्या’ प्रवेशद्वारावर संत, देवदेवता व महापुरुषांचे नवीन बॅनर पूर्ववत लावण्यात येऊन जरांगे-पाटील यांचे लावलेले बॅनरही काढण्यात आले.
गुन्हा नोंदवण्यासाठी दुसरा गट दिंद्रुड ठाण्यात
दरम्यान, शनिवारी रात्री दुसऱ्या गटातील २०० लोकांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात जाऊन विरोधी गटावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लावून धरली, तेव्हा सदरील गटास पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.