Beed: आधाराच्या नावाखाली शिक्षिकेवर अत्याचार, १ कोटीही लुटले; माजी ZP सदस्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:10 IST2025-09-05T17:09:48+5:302025-09-05T17:10:23+5:30
पैसे परत मागितल्यावर 'गाडीखाली चिरडून टाकीन' अशी धमकी. बीडमधील गुन्हेगाराची क्रूरता.

Beed: आधाराच्या नावाखाली शिक्षिकेवर अत्याचार, १ कोटीही लुटले; माजी ZP सदस्यावर गुन्हा
बीड : पतीने सोडल्यानंतर मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने एका शिक्षिकेशी जवळीक साधून तिच्यावर २००६ ते २०२२ या काळात वारंवार अत्याचार केला. एवढेच नव्हे तर मुलांना नोकरी लावतो आणि पुण्यात फ्लॅट घेऊन देतो, असे सांगून त्याने पीडितेकडून तब्बल १ कोटी १० लाख रुपये उकळले. याप्रकरणी नेकनूर जिल्हा परिषद गटाचा माजी सदस्य नारायण शिंदे याच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित ५१ वर्षीय महिला शिक्षिका आहे. २००६ मध्ये तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर पतीने दोन मुलांना घेऊन घर सोडले. यामुळे पीडिता मानसिक तणावात होती. तिच्या पतीचा मित्र असलेल्या नारायण शिंदेने याच परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने पीडितेला मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले. तसेच, पुण्यात फ्लॅट आणि मुलांना नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळ्या वेळी तिच्याकडून १ कोटी १० लाख रुपये घेतले. पीडितेने नंतर पैसे परत मागितल्यावर शिंदेने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. "वाहनाखाली चिरडून टाकीन," "खोट्या गुन्ह्यात अडकवेन" आणि "माझ्या ओळखी खूप वरपर्यंत आहेत," अशा धमक्या त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
धनंजय मुंडे, वाल्मीक कराडसोबत बैठक
पैसे परत मिळत नसल्याने पीडिता, नारायण शिंदे, आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची परळीतील जगमित्र कार्यालयात २५ नोव्हेंबर २०२३ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत शिंदेने सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. "जर शिंदेने पैसे दिले नाहीत, तर त्याची भरपाई आम्ही करू," असा विश्वास धनंजय मुंडे आणि कराड यांनी पीडितेला दिला होता, असेही तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही तिला न्याय मिळाला नाही, असे पीडितेने म्हटले आहे.
शिंदेला राजकीय पाठबळ
नारायण शिंदे हा नेकनूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झाला होता. त्याने अनेक राजकीय पक्ष बदलले आहेत. मागील काही काळापासून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याने तो सध्या पदावर नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, अजित पवारांच्या दौऱ्यात तो अनेकदा दिसतो, तसेच कधीकधी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही तो पुण्यात भेटत असल्याचे सांगितले जाते.