Beed: सकाळी १० वाजताच शाळेतील वर्गात दारू पिताना मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:39 IST2025-07-22T15:38:44+5:302025-07-22T15:39:38+5:30
तलवाडा आरोग्य केंद्रात पोलिसांकडून वैद्यकीस तपासणी

Beed: सकाळी १० वाजताच शाळेतील वर्गात दारू पिताना मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडले
गेवराई (जि. बीड) : तालुक्यातील श्रीपतअंतरवाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सुधाकर भगवान कुलकर्णी, (रा. आष्टी) यांना ग्रामस्थ व पालकांनी सोमवारी सकाळी १० वाजता शाळेतच दारू पिताना पकडत जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन वैद्यकीय तपासणी केली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
गेवराई तालुक्यातील श्रीपतअंतरवाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सुधाकर कुलकर्णी हे कार्यरत असून सोमवारी ते नेहमीप्रमाणे शाळेत आले. सकाळी १० वाजता शाळेतील वर्गातच दारू पिताना त्यांना पालकांनी पाहिले. त्यानंतर गावातील अनेक पालकांनी गर्दी करत मुख्याध्यापकाचे दारू पिताना फोटो व व्हिडिओ घेतले. त्यांनतर ग्रामस्थांनी तलवाडा पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी नशेतील मुख्याध्यापकास थेट जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात वैद्यकीस तपासणी केली. मुख्याध्यापकास तलवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, यापूर्वीही मुख्याध्यापक कुलकर्णी हे दारू पिऊन शाळेत येतात, अशी तक्रार ग्रामस्थांनी गेवराई येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे दिलेली होती.
मुख्याध्यापक दारू पिताना दिसले
मला सकाळी साडेदहा वाजता गावातील नागरिकांचा फोन आला की, मुख्याध्यापक हे वर्गात दारू पित आहेत. त्यामुळे मी तेथे जाऊन पाहणी केली असता मुख्याध्यापक त्या ठिकाणी दारू पिलेले होते, असे सरपंच उमेश आर्दड यांनी सांगितले.
वैद्यकीय तपासणीची मागणी पोलिसांकडे केली
विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखास शाळेत पाठवले. मुख्याध्यापकाने दारू घेतली असल्याचे कळल्यांनतर मुख्याध्यापकाची वैद्यकीस तपासणी करावी, अशी मागणी मी पोलिसांकडे केली. त्यानंतर तपासणी करण्यात आली. या प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.
- धनंजय शिंदे, गटशिक्षणाधिकारी, गेवराई