Beed: गोदावरी, सिंदफणाचा पूर ओसरला, आता वाळूची लूट सुरू! माफिया वापरतात 'शॉर्टकट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:04 IST2025-10-13T18:03:34+5:302025-10-13T18:04:33+5:30
कोणाच्या हद्दीतून धावतात वाहने? विशेष पथक थंड

Beed: गोदावरी, सिंदफणाचा पूर ओसरला, आता वाळूची लूट सुरू! माफिया वापरतात 'शॉर्टकट'
बीड : जिल्ह्यात वाळूचा उपसा थांबलेला असतानाही महसूल आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे. या वाहतुकीसाठी काही कर्मचाऱ्यांकडून ‘हप्ते’ घेतले जात असल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. पाटोदा पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडल्याने या प्रकरणाला अधिक दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, मध्यंतरी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांना महापूर आला होता. हे पाणी ओसरताच पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतूक सुरू झाली आहे. चकलांबा आणि तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतूनच वाळू माफिया ‘शॉर्टकट’ मारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी २२ जुलै २०२५ रोजी विशेष भरारी पथक नेमण्याचा आदेश दिला होता. मात्र, हे पथक केवळ कागदावरच असून, त्यांच्याकडून अद्याप प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कारवाई आणि बदली
वाळू वाहतुकीसाठी २० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पोलिस हवालदार सचिन अर्जुनराव तांदळे (वय ४५) याला अटक केली. या घटनेनंतर पाटोदा पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी विनोद घोळवे यांची नियुक्ती झाली, पण तेही हद्दीतील अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप आहे.
महसूल विभागाचे दुर्लक्ष
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र, हा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. काही वाळू वाहतूकदार हे पोलिस किंवा महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
चकलांबा ठाणे वादात
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आजही मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक होत आहे. स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करते, पण स्थानिक पोलिस ठाणे तात्पुरती कारवाई करून वरिष्ठांना माहिती देत असल्याची चर्चा आहे. तत्कालीन ठाणेदार एकशिंगे यांच्यानंतर आताचे संदीप पाटीलही वादात सापडले आहेत. कुख्यात आरोपी खोक्या भोसलेला मदत केल्याबद्दल कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, मात्र ठाणेदारावर अजून कारवाई झालेली नाही.
एलसीबी ॲक्शन मोडवर
पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यांनी गांजासह अवैध वाळूवरही कारवाया केल्या आहेत. मात्र, चकलांबा आणि तलवाडा पोलिस ठाणे अवैध वाळूवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.