Beed: केज तालुक्यात पावसाचा हाहाकार; तब्बल ४४ गावांचा संपर्क तुटला, १४१ घरांची पडझड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:00 IST2025-09-27T15:59:40+5:302025-09-27T16:00:48+5:30
राज्य मार्गांवर पुराचे पाणी; अनेक बसचे मार्ग वळवले, केज तालुक्याचे जनजीवन विस्कळीत

Beed: केज तालुक्यात पावसाचा हाहाकार; तब्बल ४४ गावांचा संपर्क तुटला, १४१ घरांची पडझड
- मधुकर सिरसट
केज ( बीड): शुक्रवारी रात्रभर केज तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील 6 राज्य व जिल्हा मार्गांवरील पुलावरून नदीच्या पुराचे पाणी गेल्यामुळे तब्बल 44 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे 50 हून अधिक शिक्षकांना आपल्या शाळेवर जाता आले नाहीं.
संपर्क तुटलेल्या गावात भोपला, वरपगांव, बोरगाव, खोंदला, कापरेवाडी, काळेगाव घाट, नाव्होली,हनुमंत पिंप्री, नाव्होली, दैठणा, शिरूरघाट, नांदूरघाट, बेलगाव, खटकळी, केवड, शिरपूरा, डोणगाव, जाधवजवळा, अवसगाव, वाकडी, कानडीमाळी, तरनळी, साबला, धर्माळा, सानपवस्ती, कळूचीवाडी, कोल्हेवाडी, लव्हूरी, जीवाचीवाडी, येवता, विडा, देवगाव, दहिफळ वडमाऊली, आंधळेवाडी, कोरडेवाडी, शिंदी, गप्पेवाडी, घाटेवाडी, साखरे वस्ती, तांडा, तुकुचिवाडी, बेंगळवाडी, व कल्याणवाडी यांच्यासह 44 गावांचा समावेश आहे.
3 मंडळात अतिवृष्टी...
केज तालुक्यातील केज 74.3 मिमी,हनुमंत पिंप्री 77.3 मिमी व होळ 77.5 मिमी अशी अतिवृष्टीची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी लोकमतला दिली आहे.
143 घरांची पड, झड प्रत्येकी 5 हजार मिळणार...
जोरदार पावसामुळे केज तालुक्यात आतापर्यंत एकूण 143 घरांची पडझड झाली आहे. नुकसान झालेल्या नागरिकाला घर दुरुस्तीसाठी शासनाच्यावतीने प्रत्येकी 5 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठीचा निधी आ. नमिता मुंदडा यांच्या आदेशावरून तात्काळ मंजूर करून धनादेश वाटपापासाठी तयार करण्यात येत असल्याची माहिती नायब तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.
ऐनवेळी बसचे मार्ग बदलले..
चौसाळा केज मार्गांवरील रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कुर्ला मुंबई -किल्ले धारूर ही बस मांजरसुबामार्गे धारूरला आली. कानडी माळी येथील केजडी नदीला आलेल्या पुरामुळे या मार्गांवरून जाणाऱ्या जीवाचीवाडी, आंधळेवाडी, दहिफळ वडमाऊली, धारूर, विडा मार्गे बीड या बसचे मार्ग बदलून त्यांना पुढे पाठविण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.