बीड पोलिस अॅक्शन मोडवर; वाळू माफिया, गुंडांनंतर हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:52 IST2025-02-20T15:51:57+5:302025-02-20T15:52:42+5:30
जिल्हाभरातून आलेल्या १९२ आरोपींची बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात परेड

बीड पोलिस अॅक्शन मोडवर; वाळू माफिया, गुंडांनंतर हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना तंबी
बीड : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी बीड पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून घेत प्रतिबंधात्मक कारवाया करून यापुढे गुन्हे केल्यास तडीपार, एमपीडीए, मकोकासाख्या गुन्ह्याची तंबी दिली जात आहे. याअगोदर वाळू माफियांसह गुंडांना बोलावून घेत परेड घेतली होती. मंगळवारी हाफ मर्डरसह शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांना बोलावून घेत परेड घेतली. शांतता ठेवा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला.
केज तालुक्यातील मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी झाली. त्यानंतर जिल्ह्यात वादळ निर्माण झाले. यात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित आरोपी सापडले. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आहे. त्यामुळे तत्कालीन पोलिस अधीक्षकांची बदलीही करण्यात आली. तसेच बीडमधील गुन्ह्यांचा आढावा घेत बीड आहे की बिहार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित आदींनी यावर आवाज उठविला. जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी आवाहन केले. त्याच अनुषंगाने बीड पोलिसही काम करत आहेत. वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बोलावून घेत त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. तसेच यापुढे गुन्हे केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला जात आहे. मंगळवारीही पाेलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह इतरांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सूचना केल्या.
आता कोणाचा नंबर?
सर्वांत अगोदर वाळू, गौण खनिज माफियांना बोलावून घेत परेड घेतली. त्यानंतर जिल्हा विशेष शाखेत असलेल्या गुंडा रजिस्टरची माहिती घेऊन त्यांना बाेलावले. आता शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना मंगळवारी बोलाविले होते. आता पुढचा क्रमांक कोणाचा? याकडे लक्ष लागले आहे.
सामान्यांना त्रास देऊ नका
गुन्हेगारांप्रमाणेच पोलिस दलातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही कानउघाडणी करण्यात आली आहे. सामान्य लोकांची कामे वेळेत मार्गी लावा. त्यांना त्रास होईल, असे कामे करू नका. पोलिसांबद्दल सर्वांच्या मनात विश्वास निर्माण करा, अशा सूचना अधीक्षक काँवत यांनी दिल्या आहेत. जर कोणी त्रास दिल्याची तक्रार आली तर संबंधित पोलिसावरही कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही अधीक्षकांनी दिला आहे.
एसपी ऑफिसमध्ये गर्दी
जिल्हाभरातील आरोपी पोलिस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजताच जमा झाले. त्यांची दुपारी २ वाजेच्या सुमारास परेड घेण्यात आली. तत्पूर्वी हे सर्व लोक परिसरात, कार्यालयात फिरत होते. त्यामुळे सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
कोणत्या उपविभागातील किती आरोपी?
बीड ६१ गेवराई २८
आष्टी २७
माजलगाव २१
केज २३
अंबाजोगाई ३२
एकूण १९२