Beed: तक्रार देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष, मग दारूबंदीसाठी दुकानासमोरच महिलांचा ठिय्या

By सोमनाथ खताळ | Updated: June 19, 2025 17:29 IST2025-06-19T17:28:55+5:302025-06-19T17:29:07+5:30

माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथील प्रकार

Beed: Police ignore complaint, then women sit in front of shops demanding liquor ban | Beed: तक्रार देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष, मग दारूबंदीसाठी दुकानासमोरच महिलांचा ठिय्या

Beed: तक्रार देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष, मग दारूबंदीसाठी दुकानासमोरच महिलांचा ठिय्या

माजलगाव : तालुक्यातील सिमरी पारगाव येथील तरुणांनी दोन महिन्यापूर्वी दिंद्रुड पोलिसांना गावातील दारू बंद करावी या मागणीसाठी तक्रार दिली होती. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी चक्क दारू दुकानासमोरच ठिय्या मांडत आंदोलन केले. या आंदोलनाकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले.

सिमरी पारगाव येथे हनुमान मंदिरासमोरच दोन मांस विक्री होते. या गावांमध्ये अनेक दारूच्या दुकाना थाटलेल्या आहेत. यामुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले होते. गावातील तरुणांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात दारूची दुकाने बंद करावी या मागणीसाठी १९ एप्रिल रोजी तक्रार दिली होती. परंतू त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दोन महिने उलटुनही पोलिसांनी दारू विक्रेत्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ज्या ठिकाणी दारू विक्री होते त्या ठिकाणी दबा धरून बसल्या व ज्यावेळेस दारू घेण्यासाठी ग्राहक येत होते तेव्हा त्याला धरून परत पाठवत होत्या. त्यानंतर या महिलांनी दुकानदाराला जाब विचारत या दुकानासमोरच लोकशाही मार्गाने आंदोलन केले. याचीही दिंद्रुड पोलिसांना कसल्याच प्रकारची कल्पना नव्हती. आता कारवाई न झाल्यास या पुढचे आंदोलन पोलीस अधीक्षक यांच्या दालनात करण्यात येईल, असा इशारा गावातील महिलांनी दिला.

या गावांमध्येही करणार आंदोलन
दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील सिमरी पारगाव, लोणगाव, उमरी, जीवनापूर, बेलोरा, आनंदगाव या भागामध्ये अवैध दारू व अवैध धंदे जोरात चालू असून यामुळे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचा आरोप देखील या महिलांनी केला. अशाच प्रकारचे आंदोलन या गावात देखील करण्यात येणार असल्याचा इशारा या महिलांनी दिला.

Web Title: Beed: Police ignore complaint, then women sit in front of shops demanding liquor ban