Beed: आई-वडील शेतात, घरी घडली दुर्घटना; चिमुकलीचा उकिरड्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:05 IST2025-10-06T14:04:16+5:302025-10-06T14:05:05+5:30
उकिरड्याच्या खड्यातील पाण्यात बुडून पहिलीतील ७ वर्षीय चिमुकलीचा हृदयद्रावक मृत्यू

Beed: आई-वडील शेतात, घरी घडली दुर्घटना; चिमुकलीचा उकिरड्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू
- मधुकर सिरसट
केज (बीड): तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील बजगुडे वस्तीवर रविवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराशेजारी उकिरड्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून आर्या अमोल बजगुडे (वय ७) या पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात आणि बजगुडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नेमके काय घडले?
आर्याचे आई-वडील, अमोल बजगुडे आणि त्यांची पत्नी, हे दोघेही रविवारी शाळेला सुट्टी असल्याने आर्याला घरी ठेवून घराशेजारील शेतात कामासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आर्या खेळता खेळता घराजवळील उकिरड्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ गेली. या खड्यात पावसाचे पाणी साचले होते. अचानक, आर्याचा तोल गेला आणि ती साचलेल्या पाण्यात पडली. बराच वेळ होऊनही आर्या न दिसल्याने आईने घरी धाव घेतली. तेव्हा आर्या खड्यातील पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
उपचारापूर्वीच मृत्यू
आर्याच्या आईने तात्काळ तिला पाण्यातून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. घाबरलेल्या आई-वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता तिला केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच नाका-तोंडात पाणी जाऊन आर्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या या चिमुकलीच्या अशा अचानक जाण्याने बजगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, बजगुडे वस्तीवर आणि चिंचोलीमाळी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.