Beed: केज तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने आदेश! तत्कालीन नायब तहसीलदारावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:30 IST2025-12-11T13:25:35+5:302025-12-11T13:30:02+5:30
मावेजा प्रकरणापाठोपाठ केज तहसीलमध्ये सातबारा 'घोटाळा'! बीडमध्ये प्रशासकीय गैरव्यवहाराचे सत्र सुरूच

Beed: केज तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीने आदेश! तत्कालीन नायब तहसीलदारावर गुन्हा
बीड : तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून मावेजा प्रकरण ताजे असतानाच आता तहसीलदाराच्या बनावट सहीचे अन्य प्रकरण समोर आले आहे. केज येथील तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे बनावट आदेश पारीत केल्याप्रकरणी केजच्या तत्कालीन निवासी नायब तहसीलदार आशा दयाराम वाघ-गायकवाड हिच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ अंतर्गत सातबारामधील चुका दुरुस्त करण्याचे अधिकार केवळ तहसीलदारांना आहेत. मात्र, तत्कालीन नायब तहसीलदार आशा वाघ हिने हे अधिकार नसतानाही आणि तहसीलदारांना कोणतीही कल्पना न देता, बेकायदेशीररित्या फायली ताब्यात घेतल्या. त्यानंतर मे आणि जून २०२५ या कालावधीत तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे आदेश अंमलबजावणीसाठी बेकायदेशीर मार्गाने पारीत केले. अर्धन्यायिक प्रकरण चालवून आदेश पारीत करण्याचे अधिकार केज तहसीलदार यांना असताना संबंधित शेतकरी व प्रशासनाची दिशाभूल करून तत्कालीन नायब तहसिलदार आशा दयाराम वाघ, गायकवाड यांनी बेकायदेशीर कृत्य करून बनावट स्वाक्षरीचे आदेश अंमलबजावणीस्तव तलाठी यांच्याकडे बेकायदेशीर मार्गाने व्हॉट्सॲपद्वारे पाठविल्याचे केज तहसीलदार गिड्डे यांच्या निदर्शनास आले. आरोपी आशा वाघ ही सध्या छत्रपती संभाजीनगर येथे संजय गांधी योजनेच्या तहसीलदार पदावर कार्यरत आहेत.
या गावांचे होते बनावट आदेश
मौजे दहिफळ वडमाऊली (गट नं. ९२), मौजे लाडेवडगाव (गट नं. ५८), मौजे नांदुरघाट (गट नं. २६१/२) व मौजे वाघेबाभुळगाव (गट नं. ४०/१) या चार गावातील बनावट आदेश दिल्याचे समोर आले आहे.
प्रशासकीय कारवाईनंतर गुन्हा दाखल
सदरील गंभीर प्रकाराची दखल घेत केज तहसीलदारांनी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे आशा वाघ हिच्या विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. सदरील प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार तहसीलदार गिड्डे यांनी केज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आशा वाघ हिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३३६(२), ३३७ आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॉट्सॲपवरून पाठवले आदेश
सातबारा दुरुस्तीचे आदेश पारित झाल्यावर तहसीलदारांची ऑनलाइन प्रणालीवर ई-स्वाक्षरी झाल्यानंतरच तलाठी फेरफार घेतात. मात्र, आशा वाघ हिने तयार केलेले बनावट आदेश थेट संबंधित गावांच्या तलाठ्यांना 'व्हॉट्सॲप' द्वारे पाठवून त्या आधारे अधिकार अभिलेखात नोंदी घेण्यास सांगितले. जेव्हा तलाठ्याने या फेरफार मंजुरीसाठी तहसीलदार गिड्डे यांच्याशी चर्चा केली, तेव्हा गिड्डे यांनी "मी असे कोणतेही आदेश दिलेच नाहीत," असे स्पष्ट केले. यामुळे संशय बळावला. अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता, आशा वाघ हिने या प्रकरणांच्या फाइल अभिलेख कक्षातील महसूल सहायकाकडून बेकायदेशीररित्या स्वतःच्या ताब्यात घेतल्याचेही उघड झाले.