Beed: पुराचे पाणी पार करत अधिकारी पोहोचले गावात; ६१ कुटुंबांना दिले मदतीचे धनादेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:24 IST2025-09-29T14:22:05+5:302025-09-29T14:24:34+5:30
घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य वाहून गेले; मंडळधिकारी-तलाठ्याने पुराच्या पाण्यातून दिली प्रत्येकी ५ हजारांची मदत

Beed: पुराचे पाणी पार करत अधिकारी पोहोचले गावात; ६१ कुटुंबांना दिले मदतीचे धनादेश
- नितीन कांबळे
कडा: पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या लोकांच्या घरात शिरल्याने अन्नधान्य, संसारउपयोगी सर्व साहित्य वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले होते.या कुटुंबातील लोकांना प्रशासनाकडून सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून मंडळधिकारी,तलाठी यांनी पुराचे पाणी पार करत या मदतीचे ६१ पूरग्रस्त लोकांना धनादेश सुपूर्द केले.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील नदीकाठच्या लोकांच्या घरात नदीला आलेल्या पुराचे पाणी गेल्याने घरातील सर्वकाही प्रंपच वाहून गेल्याची घटना घडली होती. हे कुटुंब उघड्यावर आले होते. यांना सावरण्यासाठी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीची मदत म्हणून ६१ पूरग्रस्तांना प्रत्येकी पाच हजार रूपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. सोमवारी दुपारी या सानुग्रह अनुदानाचे धनादेश घेऊन मंडळधिकारी नवनाथ औंदकर, तलाठी सागर अकोलकर यांनी दोनही बाजूने पुराचे पाणी असल्याने जीव धोक्यात घालत प्रशासनाची मदत सुपूर्द केली.
यावेळी सुलेमान देवळा येथील सरपंच दादा घोडके,शरद घोडके,नाजिम पठाण, आबा भादवे,आजिनाथ ओव्हाळ, परमेश्वर घोडके,दिपक डहाळे,सचिन खोरदे,भाऊसाहेब घोडके,ताराबाई तोरडमल,महिमुदा पठाण,दिपक साबळे,जगनाथ भादवे,यांच्यासह नागरिक उपस्थित होते.