कडा (बीड): आष्टी तालुक्यातील सालेवडगाव ते गणेशवाडी दरम्यान नदीवर बांधण्यात येत असलेल्या ३५ लाखांच्या पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेमुळे या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले असून, संतप्त नागरिकांनी अधिकारी आणि गुत्तेदाराला घटनास्थळीच धारेवर धरले. अखेर वाढता रोष पाहून निकृष्ट झालेले काम जेसीबीच्या साह्याने पाडून नव्याने चांगल्या दर्जाचे काम करण्याचे आश्वासन प्रशासनाला द्यावे लागले आहे.
पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर शाळकरी मुले आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून या नळकांडी पुलाला मंजुरी मिळाली होती.
'लाखोंचे काम दोन-तीन लाखांत उरकण्याचा सपाटा'ग्रामस्थांनी पुलाच्या कामाची पाहणी केली असता, बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे दिसून आले. ३५ लाख रुपयांच्या निधीतून होणारे हे काम अवघ्या दोन ते तीन लाखांत उरकण्याचा गुत्तेदाराचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अधिकारी आणि गुत्तेदाराने संगनमताने शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे नियोजन केल्याचे लक्षात येताच सोमवारी सालेवडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पुलावर जाऊन काम थांबवले.
इंजिनिअरला घातला घेराव अन् विचारला जाबकामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आष्टी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला. संतप्त नागरिकांनी निकृष्ट कामाबद्दल प्रश्नांची सरबत्ती केल्यावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. अखेर हे निकृष्ट काम पाडून पुन्हा नव्याने आणि गुणवत्तापूर्ण काम करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थ शांत झाले. इंजिनिअर सुनील राठोड यांनी याप्रकरणी गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.
भ्रष्ट अधिकारी-गुत्तेदारावर कारवाईची मागणीशासकीय निधीचा असा दुरुपयोग करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि गुत्तेदारावर केवळ आश्वासन न देता कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सालेवडगाव आणि गणेशवाडी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. ग्रामस्थांच्या या जागरूकतेमुळे भविष्यातील मोठा अपघात टळला असून, या प्रकरणाची जिल्हा स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Web Summary : Villagers in Aashti, Beed, halted construction of a substandard bridge funded by district planning. Angered by alleged corruption, they demanded and received assurance of demolition and reconstruction with quality materials. Officials promised action after facing public outcry.
Web Summary : आष्टी, बीड में ग्रामीणों ने जिला योजना द्वारा वित्त पोषित घटिया पुल का निर्माण रोका। भ्रष्टाचार से नाराज होकर, उन्होंने गुणवत्तापूर्ण सामग्री से विध्वंस और पुनर्निर्माण का आश्वासन मांगा और प्राप्त किया। अधिकारियों ने आक्रोश का सामना करने के बाद कार्रवाई का वादा किया।