बापाचा देह घरात, मुलगा परीक्षेला! युवराजने अश्रू पुसत दिला १० वीचा पेपर, सायंकाळी मुखाग्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:30 IST2026-03-05T19:29:23+5:302026-03-05T19:30:01+5:30
दोन तासांत हिंदीचा पेपर सोडवला अन् सायंकाळी पित्याला दिला मुखाग्नी

बापाचा देह घरात, मुलगा परीक्षेला! युवराजने अश्रू पुसत दिला १० वीचा पेपर, सायंकाळी मुखाग्नी
गेवराई : ज्या वयात वडिलांच्या खांद्यावर बसून जग पाहायचे, त्याच वडिलांच्या निधनाचे असीम दुःख उरावर घेऊन गेवराईतील युवराज पाचपुते या विद्यार्थ्याने दहावीचा बोर्डाचा पेपर दिला. घरात वडिलांचा मृतदेह असताना, डोळ्यांतील आसवांना वाट करून देत युवराजने बुधवारी हिंदीचा पेपर सोडविला आणि सायंकाळी जड अंतःकरणाने पित्याला मुखाग्नी दिला. त्याच्या या असीम धैर्याने संपूर्ण गेवराई तालुका हळहळला आहे.
संतोष पाचपुते (वय ४१) यांचा मंगळवारी धुलिवंदनाच्या रात्री शहरात दोन कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. घरात आक्रोश सुरू झाला, नातेवाईक जमले; मात्र अशा स्थितीतही युवराजने शिक्षण अर्धवट सोडू नये, असा विचार करून मोठ्या धैर्याने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला.
डोळ्यात अश्रूं अन् परीक्षेची जिद्द
युवराज हा सेंट झेवियर स्कूलचा विद्यार्थी असून त्याचे परीक्षा केंद्र शहरातील एका आश्रमशाळेत होते. सकाळी ११ ते २ या वेळेत त्याने हिंदी विषयाचा पेपर सोडविला. पेपर देऊन घरी परतल्यावर आपल्या पित्याचा मृतदेह पाहताच युवराजचा बांध फुटला आणि त्याने हंबरडा फोडला. उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे या दृश्याने ओलावले होते. सायंकाळी ५ वाजता चिंतेश्वर स्मशानभूमीत युवराजने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.