घरकुल महाराष्ट्रात, पैसे बिहार-यूपीच्या खात्यात; गरिबांच्या हक्काच्या रकमेवर डल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:58 IST2026-03-02T11:57:42+5:302026-03-02T11:58:15+5:30
बीड घरकुल अपडेट: लाभार्थ्यांचे पैसे परराज्यात गेल्याची ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कबुली

घरकुल महाराष्ट्रात, पैसे बिहार-यूपीच्या खात्यात; गरिबांच्या हक्काच्या रकमेवर डल्ला?
केज (जि. बीड): तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल योजनेत एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. येथील ९ स्थानिक लाभार्थ्यांच्या हक्काची घरकुलाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न होता, चक्क बिहार आणि उत्तर प्रदेशातील व्यक्तींच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या प्रकरणी दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोनाली अमोल जाधव आणि प्रा. सतीश मोराळे यांनी केली आहे.
मासिक बैठकीत फुटले भांडं
शनिवारी (दि. २८) झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सन २०२४ मध्ये मंजूर झालेल्या यादीतील ९ लाभार्थी हे परराज्यातील असून त्यांची नावे ना स्थानिक मतदार यादीत आहेत, ना ते येथील रहिवासी आहेत. तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. "स्थानिक गरिबांची फसवणूक करून शासनाचा निधी लाटणाऱ्यांवर कारवाई व्हावी," अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली आहे.
ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कबुली
या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी भगवान सिरसट यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, "आम्ही स्थानिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांसह रीतसर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवले होते. मात्र, तरीही ९ जणांचे हप्ते परराज्यातील लोकांच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चूक नेमकी कुठे झाली आणि किती रक्कम वर्ग झाली, याची यादी आम्ही पंचायत समितीकडे मागितली आहे."
टेक्निकल एक्सपर्ट करणार चौकशी
गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "रीतसर तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीड येथील तांत्रिक विभागाच्या 'टेक्निकल एक्सपर्ट'मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.