Beed: शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, परळीत बिबदरा पाझर तलाव फुटून शेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:21 IST2025-08-28T16:20:48+5:302025-08-28T16:21:23+5:30

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतजमीनी वाहून जाऊन अतोनात नुकसान झाले आहे

Beed: Heavy rains caused the Bibadara Pazar pond in Parli to burst, causing immense damage by washing away farmland | Beed: शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, परळीत बिबदरा पाझर तलाव फुटून शेतीचे मोठे नुकसान

Beed: शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष, परळीत बिबदरा पाझर तलाव फुटून शेतीचे मोठे नुकसान

- संजय खाकरे
परळी ( बीड) : 
सततच्या पावसामुळे बोरणा नदीवरील भोजनकवाडी नागदरा येथील बिबदरा पाझर तलाव गुरुवारी सकाळी फुटला आहे. त्यामुळे तलावाखालील शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. ३५ वर्षापूर्वी माजी ग्रामविकास राज्य मंत्री पंडितराव दौंड यांच्या मंत्रीपदाच्या काळात बिबदरा पाझर तलाव बांधण्यात आला होता. या तलावाच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी केली होती. परंतु, पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने पाझर तलाव फुटून शेतजमीनी वाहून जाऊन अतोनात नुकसान झाल्याचा आरोप माजी आमदार संजय  दौंड यांनी केला आहे. 

परळी तालुक्यातील नंदनज येथील बोरणा मध्यम प्रकल्प २४ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाला असून, प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. या जलसाठ्यामुळे बोरणा मध्यम प्रकल्पाखालील नंदनज, कासारवाडी, सारडगाव ,मिरवट, मांडवा व इतर गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच सारडगाव व नंदनज परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नंदनज येथील बोरणा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे बोरना नदीवरील भोजनकवाडी नागदरा येथील बिबदरा पाझर तलाव गुरुवारी सकाळी फुटला आहे. त्यामुळे तलावाखालील शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे परळी तालुक्यातील लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला होता. या प्रकल्पातून परळी शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने परळीकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. याशिवाय, परळी तालुक्यातील बोधेगाव मध्यम प्रकल्प,  तसेच मालेवाडी, कनेरवाडी,  चांदापूर ,मोहा हे लघु प्रकल्प ही शंभर टक्के भरले आहे. तसेच करेवाडी, गुट्टेवाडी, गोपाळपूर, दैठणा घाट यांसारख्या लघु प्रकल्पांमध्येही पाणीसाठा वाढल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचीही चिंता दूर झाली आहे. 

अधिकाऱ्याकडून पाहणी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पाझर तलाव बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटल्याची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सावंत, तलाठी भताने यांनी आज पाहणी केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तलावाच्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे का, याबाबत पाहणी करण्याचे आदेश  परळी चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना  दिले.
या तलावातील पाणी थेट बोरणा नदीत मिसळत असल्याने बोरणा नदीकाठच्या गावातील व शिवारातील नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सदर घटनेची प्राथमिक माहिती नैसर्गिक आपत्ती विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आलेली आहे.

Web Title: Beed: Heavy rains caused the Bibadara Pazar pond in Parli to burst, causing immense damage by washing away farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.