Beed: घरकुलासाठी मागितली लाच, ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:53 IST2025-09-19T15:52:24+5:302025-09-19T15:53:16+5:30
केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातच लाच घेताना पकडले

Beed: घरकुलासाठी मागितली लाच, ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
बीड: पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणारे 'बे बाकी' प्रमाणपत्र देण्यासाठी २ हजार रूपयांची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर सुरेश ठोंबरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.
एका ३५ वर्षीय पुरुषाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. ठोंबरे यांनी तक्रारदाराच्या घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी ५ हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही ४ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून दोन हजार रूपये स्वीकारण्याचे मान्य केले. १९ सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीने केज येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रूपये घेताच त्याला पथकासमोर रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सोपान चिटमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार अनिल शेळके, अविनाश गवळी आणि अंबादास पुरी यांनी ही कारवाई केली. ठोंबरे याच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती.