"ट्रकच्या आत दारूसाठी चोर कप्पे!"; बीडमध्ये गोवा बनावटीची ५२ लाखांची अवैध दारू जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:55 IST2026-03-14T15:50:46+5:302026-03-14T15:55:02+5:30
बीड उत्पादन शुल्क विभागाचा धडाका; तस्करांचा नवा फंडा पोलिसांनी उधळला

"ट्रकच्या आत दारूसाठी चोर कप्पे!"; बीडमध्ये गोवा बनावटीची ५२ लाखांची अवैध दारू जप्त!
बीड: तालुक्यातील चौसाळा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई करत ५१ लाख ८८ हजार ५२० रुपये किमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. सोलापूर-बीड रोडवर १२ मार्च रोजी ही धडक कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी ट्रकसह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
ट्रकमध्ये बनवले होते 'चोर कप्पे'
उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चौसाळा शिवारात एका सहा चाकी ट्रकची (क्र. MH 23 AU 7275) तपासणी करण्यात आली. वरून पाहताना हा ट्रक सामान्य वाटत असला, तरी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यात शिताफीने तयार केलेले 'चोर कप्पे' आढळून आले. या कप्प्यांमध्ये महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गोवा बनावटीचा २०० बॉक्स विदेशी मद्यसाठा दडवून ठेवण्यात आला होता.
तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल
ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक विश्वजीत देशमुख आणि निरीक्षक संजय कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. पोलिसांनी मद्यासह ट्रकही जप्त केला असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. "अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती दिल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल," असे आवाहन अधीक्षक विश्वजीत देशमुख यांनी केले आहे.