बीड जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये! तीन कामचुकार कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:48 IST2025-09-03T16:47:56+5:302025-09-03T16:48:31+5:30
कामात दिरंगाई करणाऱ्यांवर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; तीन महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन

बीड जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये! तीन कामचुकार कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी निलंबन
बीड : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ३० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कारणावरून निलंबित केले आहे. गेवराई तहसील कार्यालयातील महसूल सहायक, सहायक महसूल अधिकारी व पाटोदा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
जयश्री नारायण टाक (महसूल सहायक, तहसील कार्यालय, गेवराई), अभिजीत मधुकर दहिवाळ (सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय, गेवराई) व संतोष सुदाम हांगे (मंडळ अधिकारी, थेरला तहसील कार्यालय, पाटोदा) अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
गेवराई तालुक्यातील केवळ ७ प्रकरणांतील निर्णय ईक्यूजे प्रणालीवर अद्यावत करण्यात आले होते. शासनस्तरावरून व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अर्धन्यायिक प्रकरणात निर्णय पारित झाल्यानंतर त्याबाबतची माहिती ईक्यूजे प्रणालीवर अद्यावत करण्याची कार्यवाही प्रलंबित होती. गेवराई तहसीलदारांनी संकलनाची जबाबदारी महसूल सहायक जयश्री नारायण टाक व सहायक महसूल अधिकारी अभिजीत मधुकर दहिवाळ यांना दिली होती. प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांची स्थिती ज्ञात असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा व अनियमितता केलेली आहे. शासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी जयश्री टाक व अभिजीत दहिवाळ यांना निलंबित करण्यात आले.
पाटोदा तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या थेरला गावचे मंडळ अधिकारी संतोष सुदाम हांगे यांच्या मंडळातील फेरफार प्रलंबित होता. नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपापासून केवायसी मोठ्या प्रमाणात प्रलंबित ठेवणे, अनुदान वाटपाच्या अनुषंगाने आयोजित कार्यालयातील बैठकीला गैरहजर राहणे, वरिष्ठांनी सूचना देऊनही प्रपत्र अ व वसुलीबाबत दुर्लक्ष करणे, कारणे दाखवा नोटीसचे उत्तर मुदतीत सादर न करणे, उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही फेर मंजूर करणे आणि विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहणे, इत्यादी अनियमितता केली. शासकीय कामकाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले तसेच कर्तव्यात सचोटी ठेवली नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ३ नुसार गैरवर्तन ठरते. त्यामुळे मंडळ अधिकारी संतोष सुदाम हांगे यांना निलंबित करण्यात आले.