बीड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये करोडोंची डील; पीएसआयनंतर हवालदार, चालकही निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:54 IST2025-04-10T11:19:20+5:302025-04-10T11:54:52+5:30

एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे.

Beed Cyber Police's deal worth crores in Gujarat; After PSI, constable, driver also suspended | बीड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये करोडोंची डील; पीएसआयनंतर हवालदार, चालकही निलंबित

बीड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये करोडोंची डील; पीएसआयनंतर हवालदार, चालकही निलंबित

बीड : परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यावर कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला. प्राथमिक चाैकशीत दोषी आढळल्याने सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांचे निलंबन झाले होते. आता त्यांच्यासोबत गेलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे. यामुळे ठाणेदारही अडचणीत आले असून, कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

सायबर पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्याकडे होता. त्यात एक आरोपी अटक केला. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली होती, परंतु याच पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजीत कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत हे तिघे जण खासगी वाहनाने या आरोपीला घेऊन गुजरात राज्यात गेले. त्या आधी त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली नाही. त्यानंतर गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षक काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी करून कासले यांना तडकाफडकी निलंबित केले होते, तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केजचे सहायक अधीक्षक कमलेश मिना यांच्याकडे सुरू होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचेही निलंबन करण्यात आले.

खासगी वाहनातून आरोपी गुजरातमध्ये
कासले यांच्यासह गिरी, भाग्यवंत यांनी शासकीय ऐवजी खासकी वाहन गुजरातमध्ये नेले. भाग्यवंत हे सुट्टीवर होते. तसेच, सायबर पोलिस ठाण्यात वाहन नसतानाही त्यांची पोस्टींग तेथेच होती. तर, गिरी हे देखील एका ठिकाणी युनिफॉर्मवर बैठकीत बसल्याचे दिसले. हे सर्व पुरावे पाहून आणि चौकशीतील मुद्द्यांवरून काँवत यांनी गिरी व भाग्यवंत यांनाही निलंबित केले.

कासलेंचे व्हिडीओ अन् पोलिसांची बदनाम
निलंबित केल्यानंतर रणजीत कासले यांनी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. यात अनेकांवर आरोप केले. आता देखील त्यांचे व्हिडीओ सुरूच आहेत. त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा बीड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे.

पोलिस निरीक्षकही अडचणीत
सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांचीही चौकशी झाली आहे. त्यांचाही कसुरी अहवाल पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विशेष पाेलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांच्यावरही गंभीर आरोप असल्याचे सूत्रांनी सांगितले जात आहे. आता आयजी हे गात यांच्यावर कारवाई करतात की पाठीशी घालतात? याकडे लक्ष लागले आहे.

सायबर ठाणेदारही बदलणार ?
पोलिस ठाण्यातील कर्मचारी दोषी आढळला, तर ठाणेदाराला जबाबदार धरून कारवाई करणार, असे पोलिस अधीक्षक काँवत यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. आता या प्रकरणात एका पीएसआयसह दोन कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यामुळे गात यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. गात यांना नियंत्रण कक्षात घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी दुपारपर्यंत तसे आदेश निघाले नव्हते.

कारवाई होणारच
सायबर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित केले आहेत, तसेच पोलिस निरीक्षक यांचाही कसुरी अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पाठवला आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे. चांगले काम करणाऱ्यांना माझे पाठबळ असेल.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

Web Title: Beed Cyber Police's deal worth crores in Gujarat; After PSI, constable, driver also suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.