Beed: दगडवाडी शिवारात क्रूरतेचा कळस! रंगकाम करणाऱ्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:47 IST2026-02-02T16:46:43+5:302026-02-02T16:47:23+5:30
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Beed: दगडवाडी शिवारात क्रूरतेचा कळस! रंगकाम करणाऱ्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या
पाटोदा (बीड): पाटोदा-शिरूर कासार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डोंगरदेवी दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. रायमोह येथील रहिवासी असलेल्या चांद ऊर्फ गुड्डू अलाउद्दीन तांबोळी (वय ३०) या तरुणाची अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं? चांद हा व्यवसायाने रंगारी होता आणि कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत असे. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दगडवाडी शिवारात नागरिकांना एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. जवळ जाऊन पाहिले असता गुड्डूचा चेहरा ओळखूनही येत नव्हता. मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर दगडाने इतके भीषण प्रहार केले होते की त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रायमोहच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला की पैशांच्या व्यवहारातून, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या रायमोह परिसरात तणावपूर्ण शांतता असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.