गुन्हा काय दाखल करता? थेट माझे एन्काउंटर करून केस बंद करा; ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 11:54 IST2025-07-19T11:53:35+5:302025-07-19T11:54:35+5:30
Beed Crime: महादेव मुंडे खून प्रकरण : ज्ञानेश्वरी मुंडे पोलिसांवर संतापल्या; मुख्यमंत्र्यांना भेटणार

गुन्हा काय दाखल करता? थेट माझे एन्काउंटर करून केस बंद करा; ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या
बीड : परळी येथील मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हे समजताच त्या पोलिसांवर संतापल्या. माझ्यावर १०० गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही. पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याऐवजी माझे एन्काउंटर करावे, म्हणजे महादेव मुंडेची केस बंद होईल, संतप्त प्रतिक्रिया माध्यमांना शुक्रवारी दिली.
महादेव मुंडे खून प्रकरणाला २० महिने उलटले आहेत. तरीही बीड पोलिसांना अद्याप आरोपी कोण, हे समजले नाही. त्यामुळेच संतापलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा देत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली होती. भेटून परतताना ज्ञानेश्वरी यांनी विषारी द्रव प्राशन केले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
काय म्हणाल्या ज्ञानेश्वरी मुंडे
आतापर्यंत पोलिस अधीक्षकांची चार वेळा भेट घेतली. त्यांच्याकडून प्रयत्न करतो, असे अश्वासन दिले जात होते. परंतु वारंवार तोच शब्द दिल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी मला न्याय देण्याऐवजी माझ्यावरच गुन्हा दाखल केला आहे. पीडितांवर हा अन्याय आहे. पण, कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही. आणखी महिनाभर थांबून पुन्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहन करणार, असा इशारा ज्ञानेश्वरी यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मागितली आहे. तीन दिवसांत आपण त्यांना भेटणार आहोत. त्यांनी किमान १० मिनिटे तरी वेळ द्यावा. त्यासाठी त्यांच्या बंगल्यावर जाऊ, असेही त्यांनी सांगितले.
यंत्रणेचा खर्च होणार वसूल
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासाठी पोलिस, आरोग्य, अग्निशमन, महसूल असे विविध विभाग पोलिस अधीक्षक कार्यालयात १७ जुलै रोजी तैनात होते. त्यांचे समाधान केल्यानंतरही त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एवढेच नव्हे तर या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या सर्व यंत्रणेचा खर्चही त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. पोलिसांकडून तशी तजवीज ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
युट्यूबवर पाहून बनविले विषारी द्रव
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या कुटुंबाने आणलेल्या पेट्रोलच्या बाटल्या पोलिसांनी गेटच्या बाहेरच काढल्या. परंतु परत जाताना ज्ञानेश्वरी यांनी एका छोट्या बाटलीत विषारी द्रव आणून ते प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यात उंदीर मारण्याचे विष होते. पावडर आणि पाणी मिसळून ते एका छोट्या बाटलीत ज्ञानेश्वरी यांनी आणले. हे त्यांनी यूट्यूबवर पाहिले होते. संयम सुटल्यानंतर त्यांनी ते प्राशन करण्याचा प्रयत्न केला, असा दावा ज्ञानेश्वरी यांचे बंधू सतीश फड यांनी केला आहे.