नेमका वाद काय झाला? पोटच्या मुलानेच बापाचा जीव घेतला, डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:22 IST2026-03-30T08:16:46+5:302026-03-30T08:22:46+5:30

या धक्कादायक घटनेतील आरोपी मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना

Beed Crime: What exactly happened in the dispute? Son threw a stone at his sleeping father's head, he died on the spot | नेमका वाद काय झाला? पोटच्या मुलानेच बापाचा जीव घेतला, डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

नेमका वाद काय झाला? पोटच्या मुलानेच बापाचा जीव घेतला, डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

- नितीन कांबळे 
कडा (बीड): 
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या राहत्या झोपडीत गाढ झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिल सजन मुळे (वय ५०) असे मृत पित्याचे नाव असून, आरोपी मुलगा करण मुळे (वय १९) सध्या फरार आहे.

​मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी येथील रहिवासी असलेले हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कडा शहरात मजुरीसाठी स्थायिक झाले होते.

​झोपेत असतानाच काळाचा घाला
​मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मुळे आणि त्यांचा मुलगा करण हे बसस्थानक परिसरात झोपड्या टाकून राहत होते. सोमवारी पहाटे वडील गाढ झोपेत असताना त्याने अचानक त्यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात अनिल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे मृताची पत्नी झोपेतून उठली असता तिला ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. तिने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.त्याने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणाने उचलले, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.

​आरोपी मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना
​घटनेची माहिती मिळताच आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृताच्या पत्नीने मुलगा दारूच्या नशेत होता त्यानेच हे कृत्य केल्याची माहिती दिली आणि एकच हंबरडा फोडला. हत्येनंतर आरोपी किरण मुळे हा फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके तयार केली आहेत.

​पोलीस दलाचा मोठा ताफा घटनास्थळी
​या घटनेच्या गांभीर्यामुळे पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, अमोल नवले, प्रभाकर खोले, भाऊसाहेब आहेर यांच्यासह मोठा फौजफाटा कडा शहरात दाखल झाला आहे. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात नेमका काय वाद झाला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title : बीड जिले में नशे में धुत बेटे ने सो रहे पिता को पत्थर से मारा, मौत

Web Summary : बीड में, एक नशे में धुत बेटे ने सोते हुए पिता पर पत्थर से जानलेवा हमला किया। घटना कड़ा बस स्टैंड के पास हुई। आरोपी बेटा फरार है; पुलिस उसकी तलाश कर रही है। मकसद जानने के लिए जांच जारी है।

Web Title : Drunk son kills sleeping father with stone in Beed district.

Web Summary : In Beed, a drunk son fatally attacked his sleeping father with a stone. The incident occurred near Kada bus stand. The accused son is absconding; police are searching for him. Investigation underway to determine the motive.