Beed Crime: अमानुषतेची हद्द! निवृत्त फौजदाराला बेदम मारहाण; पाणी मागितले तर तोंडावर लघुशंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:15 IST2025-07-14T13:14:27+5:302025-07-14T13:15:00+5:30

Beed Crime: अपहरण केलेल्या सालगड्याला सोडविण्यासाठी गेलेल्या निवृत्त सहायक फौजदाराचा दोन तास छळ

Beed Crime: The height of inhumanity! Retired soldier brutally beaten; Urinated on his face when asked for water | Beed Crime: अमानुषतेची हद्द! निवृत्त फौजदाराला बेदम मारहाण; पाणी मागितले तर तोंडावर लघुशंका

Beed Crime: अमानुषतेची हद्द! निवृत्त फौजदाराला बेदम मारहाण; पाणी मागितले तर तोंडावर लघुशंका

बीड : सालगड्याला अपहरण केल्यानंतर सोडविण्यासाठी गेलेल्या निवृत्त सहायक फौजदाराला १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली. यात चार ते पाच ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. शिवाय पाणी मागितले, तर यातील तिघांनी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली. दोन तास मारहाण केल्यानंतर मुलाने येऊन सुटका केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी १२ ते २ या वेळेत माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारात घडला. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, रात्री ९ वाजता माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजाराम दाजीबा सिरसाट (वय ६१, रा.चिंचगव्हाण, ता.माजलगाव), असे जखमीचे नाव आहे. त्यांच्याकडे सालगडी म्हणून नातजावई विश्वनाथ पंडित आहेत. ते दारू पिण्याच्या सवयीचे आहेत. ते ऊसतोड मजूर असून, त्यांनी मंजरथ (ता. पाथरी) येथील एका मुकादमाकडून १२०० रुपये घेतले होते. ते पैसे न दिल्यानेच त्यांचे अपहरण करून लवूळ येथील स्मशानभूमीत नेले. विश्वनाथने राजाराम यांना संपर्क करून बोलावून घेतले. यावेळी मुकादमाने १२०० रुपयांच्या बदल्यात दीड लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे घेऊन गेल्यानंतर त्यांनी विश्वनाथला सोडून राजाराम यांना पकडले. त्यांना मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवरून ढोरगाव शिवारात नेले. तेथे कत्ती, लोखंडी रॉड, काठ्या आदींनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पाणी मागितले तर त्यांच्या तोंडावर लघुशंका केली, असा आरोप राजाराम यांनी केला आहे.

इस में तो मास्टर हैं...
राजाराम यांच्यावर हल्लेखोर बंदूक घेऊन धावले; परंतु त्यांनी त्यांच्या हातून ती हिसकावली. त्यानंतर तिचे स्ट्रीगर दाबले; परंतु त्यात काडतूस नव्हते. यावेळी सर्व आरोपी हसत होते. इस में तो हम मास्टर हैं.. असे म्हणत त्यांनी पुन्हा मारहाण केली, असेही राजाराम यांनी सांगितले.

३८ वर्षे पोलिस म्हणून सेवा
राजाराम हे ३० जून २०२२ रोजी ३८ वर्षे सेवा करून पोलिस दलातून निवृत्त झाले. २०१७-१८ साली ते माजलगाव क्राइम मोहरील होते. तेव्हा त्यांच्या ताब्यातील वाळू, ट्रॉलीसह इतर मुद्देमाल चाेरी झाला होता. यात राजाराम यांची विभागीय चौकशी लागून कारवाई झाली होती. मुद्देमाल लंपास करणाऱ्यांपैकीच हे लोक असावेत, असा संशय राजाराम यांनी व्यक्त केला आहे; परंतु अधिकृत दुजोरा त्यांनीही दिला नाही.

जखमीला मी भेटलो आहे. जखमा पाहून अंगावर शहारे आले. यातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर मकोका लावावा, अशी मागणी आपण पोलिस अधीक्षकांकडे करणार आहोत.
-राहुल दुबाले, अध्यक्ष पोलिस बॉइज संघटना, बीड

जखमीचा जबाब घेतला असून, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ॲट्रॉसिटीसह विविध कलमे लावली असून, तोंडावर लघुशंका केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
- देवीदास सोनवळ, सहायक पोलिस निरीक्षक, माजलगाव ग्रामीण

Web Title: Beed Crime: The height of inhumanity! Retired soldier brutally beaten; Urinated on his face when asked for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.