Beed: 'ती' नवरी निघाली लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या गँगची मेंबर! टोळीच जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:47 IST2025-08-20T12:46:05+5:302025-08-20T12:47:11+5:30
लग्नानंतर वधूच्या नातेवाइकांनी संशयास्पद वर्तन केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

Beed: 'ती' नवरी निघाली लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या गँगची मेंबर! टोळीच जेरबंद
वडवणी (जि. बीड) : लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला वडवणी पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर रोमन (रा. वडवणी) नावाच्या तरुणाचे लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने या टोळीने त्याच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले होते. लग्नानंतर वधूच्या नातेवाइकांनी संशयास्पद वर्तन केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
ज्ञानेश्वर यांचे लग्न जालना जिल्ह्यातील ‘राधा’ नावाच्या मुलीसोबत ठरले. या बदल्यात टोळीने २ लाख रुपयांची मागणी केली होती; पण, तडजोडीअंती १ लाख ७० हजार रुपये दिले गेले. लग्नानंतर मुलीची आई न येता, तिला घेण्यासाठी सोमेश वाघमारे आणि प्रियंका बाफना आले. त्यांच्या बोलण्यावर संशय आल्याने ज्ञानेश्वर आणि त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना थेट वडवणी पोलिस ठाण्यात नेले.
सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी चौकशी केली असता, हा लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी असल्याचे समोर आले. ज्ञानेश्वर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नऊ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
दोन महिन्यांत दुसरी कारवाई
वडवणी पोलिसांनी अशा प्रकारची दोन महिन्यांतील ही दुसरी कारवाई केली आहे. यापूर्वी, उपळी येथील एका ऊसतोड मजुराची याच पद्धतीने ३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यावेळीही संशयास्पद वर्तन लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, ही फसवणूक करणारी टोळी असल्याचे उघड झाले होते. यावरून, लग्नासाठी स्थळ शोधणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अशी आहेत आरोपींची नावे
महादेव जनार्दन घाटे (रा. उपळी ता.वडवणी), कैलास बाबाराव दळवी, जनार्दन प्रल्हाद थोरात (रा. रिसोड, जि. वाशिम), वनमाला मुन्ना शर्मा, राधा मुन्ना शर्मा (रा. कन्हय्यानगर, जालना), माधुरी फराज खान, सोमेश सुनील वाघमारे (रा. रमाबाई नगर, रेल्वे स्टेशन जुना जालना), प्रियंका ललितकुमार बाफना (रा. न्यू मोढा रोड, जालना) व एका अनोळखी महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील नवरी राधासह प्रियंका आणि सोमेश या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.