Beed Crime: धक्कादायक! पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरात दोनदा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:25 IST2025-06-13T16:25:31+5:302025-06-13T16:25:45+5:30

बीडमधील प्रकार : पहिला नवरदेव पळाला, दुसरा पाठलाग करून पकडला

Beed Crime: Shocking, a fifth-grade girl was married twice within an hour | Beed Crime: धक्कादायक! पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरात दोनदा विवाह

Beed Crime: धक्कादायक! पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरात दोनदा विवाह

बीड : शाळेत जाण्याची तयारी करणाऱ्या पाचवीच्या वर्गातील मुलीचा तासाभरातच दोन वेळा विवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. तक्रारीची कुणकुण लागताच पहिला नवरदेव पळून गेला, तर दुसऱ्याला नवरीला घेऊन जात असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर पकडण्यात आले. रात्री ९ वाजता दोन नवरदेवांसह त्यांचे नातेवाईक व मुलीचे आई-वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनिया (नाव बदलले, रा. बीड) ही अवघ्या १३ वर्षांची आहे. नुकतीच ती पाचवी पास झाली असून, सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होती. तिला वडील आणि सावत्र आई आहे. परंतु, त्यांनी सोनियाचे लग्न आधीच दोन विवाहासह दोन मुलांचा बाप असलेल्या सुलेमान पठाण (२५, रा. बेलखंडी पाटोदा, ता. बीड) याच्यासोबत जुळवले. गुरुवारी सकाळी ८ वाजताच शाहूनगर भागातील घरात विवाह लावला. त्याचे फोटोही काढले; परंतु सुलेमानच्या पत्नीने तक्रार केली. याची कुणकुण सुलेमानला लागली. त्यामुळे त्याने आपल्या बहिणीच्या गावच्या आसेफ शेख (रा. खांडवी, ता. गेवराई) याला तेथे पाठवले आणि स्वत: पळून गेला. त्यानंतर मुलीचा विवाह आसेफबरोबर झाला. त्या विवाहाचे फोटोही काढले. या प्रकरणात कोणाला संशय येऊ नये, म्हणून आसेफ हा नवरीला घेऊन जात होता. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना मिळाली. त्यांनी लगेच पोलिस यंत्रणेशी संपर्क साधून त्यांना बार्शी रोडवर पकडले. या सर्वांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणल्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यातील पीडितेला बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे. अध्यक्ष अशोक तांगडे हेदेखील पोलिस ठाण्यात पोहोचले होते.

गुरुवारीच निघाले अटक वॉरंट
सुलेमानला पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. त्यांच्यात वाद झाले असून, न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याच प्रकरणात त्याला गुरुवारी अटक वॉरंट निघाल्याचे पत्नीने सांगितले होते. दुसरी पत्नीही त्याच्या नात्यातील असून, तिला मुलगा आहे. अगोदर दोन बायका असतानाही सुलेमान याने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीसोबत तिसरा विवाह केल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाने सहकार्य केले नाही
बालविवाहाची माहिती मिळताच पाेलिसांना सांगितले. पाचवीच्या वर्गातील मुलीचे दोन विवाह झाल्याचे समोर आले. परंतु, यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केले नाही. टोलवाटोलवी केली. अशाने बालविवाह कसे थांबतील, हा प्रश्न आहे.
-तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड

नातेवाइकांविरोधात तक्रार
या प्रकरणात सुलेमान पठाण आणि आसेफ शेख यांच्यासह मुलीचे व दोन्ही मुलांच्या नातेवाइकांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे.
-मन्सुरी अन्सार अहमद, तालुका संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास कार्यालय, बीड

Web Title: Beed Crime: Shocking, a fifth-grade girl was married twice within an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.